खाण खात्याने विविध जेटींवर तसेच यापूर्वीच्या खाण लीजधारकांच्या खाणींवर असलेल्या खनिजाचा ई-लिलाव पुढे ढकलला आहे. त्यामुळे आता हा ई-लिलाव 8 ते 10 मेऐवजी 16 ते 18 मे ह्या दरम्यान होणार आहे. त्यासंबंधीचा आदेश गोवा खाण खात्याने सोमवारी काढला. ह्या ई-लिलावाद्वारे 10 लाख टन एवढ्या लोहखनिजाचा लिलाव केला जाणार आहे. गोवा खाण खात्याने यापूर्वी 27 वेळा लोह खनिजाचा ई-लिलाव केलेला असून, हा 28 वा ई-लिलाव असेल, असे खाण खात्याने स्पष्ट केले आहे. सर्व आवश्यक हे परवाने घेतल्यानंतर हा ई-लिलाव करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारितील एमएसटीसीच्यावतीने मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन) हा ई-लिलाव करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी ज्या स्थितीत हे लोह खनिज आहे, त्या स्थितीत ह्या लोहखनिजाचा ई-लिलाव करण्यात येणार असल्याचेही खाण खात्याने आपल्या आदेशात म्हटले आहे.