खणगिणी समुद्रात बोट उलटून ३ रशियन बुडाले

0
112
किनार्‍यावर आणलेली पर्यटक बुडाले ती बोट. (छाया : गणादीप शेल्डेकर)

मनाई असतानाही समुद्र पर्यटन चालूच
बोटचालक व बोटमालकास अटक
मोबर येथून बोटीतून समुद्र पर्यटनासाठी गेलेल्या तीन महिला व सात पुरुष पर्यटकांपैकी तीन महिला बुडून मरण पावण्याची घटना काल सकाळी ११.३० वा. घडली. ‘निलोफर’ वादळाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोव्यातील सर्व तालुक्यांना धोक्याचा इशारा दिलेला असताना व खवळलेल्या समुद्रामुळे मच्छीमारांना मनाई केली असताना दुसर्‍याबाजूने बोटींद्वारे समुद्र पर्यटन सर्राच चालू आहे. अपघात घडला त्या बोटीसह एकुण १० बोटी काल समुद्रात गेल्या होत्या.दरम्यान, दुर्घटनेस जबाबदार ठरवून बोटचालक जगबंधू नाईक (ओरिसा) व बोट मालक बार्रेटो यांना कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केली आहे.
मोबर येथून गेलेली ही बोट जोरदार लाटा धडकल्याने खणगिणी येथे उलटून पडली. त्यावेळी तीन महिला बुडाल्या तर चालकासह सात जणांनी पोहून किनारा गाठला.
मरण पावलेल्या महिलांची नावे ऍलीना कुसीकोवा, निकोलेवा टेरानिवा व पुलोतेवा इरिना अशी आहेत. बुडाल्याच्या घटनेनंतर बर्‍याच वेळाने जीवरक्षकांनी त्यांचे मृतदेह शोधून समुद्राबाहेर आणले. अधिक माहितीनुसार अपघातग्रस्त बोट खणगिणी येथे पोचली तेव्हा एक मोठी लाट आली व बोटीत पाणी भरले. त्यातून सावरताना लगेच एकामागोमाग दोन मोठ्या लाटा आल्या, ज्यात बोट उलटली व तिन्ही महिला बोटीखाली पडल्या व बुडाल्या. इतर सात जणांनी पोहून किनारा गाठला. जलक्रिडा संपवून खणगिणी किनार्‍यावर परतायची तयारी करीत असतानाच ही घटना घडली. पोलीस अधीक्षक शेखर प्रभूदेसाई, उपअधीक्षक मोहन नाईक व कुंकळ्ळी पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या घटनेनंतर तातडीने अतिरिक्त जिल्हाधिकारी दामोदर मोरजकर यांनी उपजिल्हाधिकार्‍यांची बैठक घेऊन घटनेचा आढावा घेतला व अहवाल द्यायला सांगितले.