‘क’ वर्ग सरकारी नोकर भरतीविषयी इच्छुकांत संभ्रम

0
109

सरकारने राज्यातील ‘क’ वर्गीय सरकारी नोकर भरतीची प्रक्रिया तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला असतानाच काल त्या पदांसाठीचे अर्ज ऑनलाईन उपलब्ध करुन दिल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सर्व सरकारी खात्यांतील पदांची भरती यापुढे राज्य कर्मचारी निवड आयोगामार्फतच होणार असल्याचे स्पष्ट करीत तूर्त नोकर भरतीची प्रक्रिया स्थगित केली होती. ‘क’ वर्गीय नोकर भरतीच्या जाहिराती देणे सर्व खात्यांनी थांबवावे व दिलेल्या जाहिराती मागे घ्याव्यात, अशी लेखी सूचना त्यांनी सर्व खाते प्रमुखांना केली होती.

मात्र, ही गोष्ट ताजी असतानाच काल सरकारने गोमेकॉतील पदे भरण्यासाठीचे अर्ज ऑनलाईन उपलब्ध करुन दिल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हे सगळे संशयास्पद असे वाटत असल्याच्या प्रतिक्रीया काल काही इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केल्या. सरकारने याबाबत खुलासा करावा, अशी मागणीही होऊ लागली आहे.
काही दिवसांपूर्वी भर गणेश चतुर्थीच्या दिवसांत इच्छुक उमेदवार व त्यांच्या पालकांनी गोमेकॉसाठीच्या पदांसाठीचे अर्ज ऑनलाईन उपलब्ध नसल्याने गोेमेकॉमध्ये येऊन रांगेत उभे राहून अर्ज मिळवले होते.