इंग्लंड-ऑस्ट्रेलिया पाचवी कसोटी आजपासून

0
137

इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातील ‘ऍशेस’ मालिकेतील पाचवा व शेवटचा कसोटी सामना आजपासून ‘दी ओव्हल’वर खेळविला जाणार आहे. इंग्लंडने या सामन्यासाठी आपल्या संघात दोन बदल केले असून क्रेग ओव्हर्टन व जेसन रॉय यांच्या जागी सॅम करन व ख्रिस वोक्स या अष्टपैलूंचा समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे कांगारूंनी आपल्या १२ सदस्यीय संघातून ट्रेव्हिस हेड याला बाहेरचा रस्ता दाखवून अष्टपैलू मिचेल मार्शला संधी देण्यात आली आहे.

प्रमुख जलदगती गोलंदाज पॅट कमिन्स याच्यावरील गोलंदाजीचा भार कम करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाने मिचेलला निवडल्याचे मानले जात आहे. तर बेन स्टोक्सचा खांदा दुखावल्याने एका अतिरिक्त गोलंदाजाची जागा भरून काढण्यासाठी डावखुरा स्विंग गोलंदाज करनला निवडणे इंग्लंडसाठी अपरिहार्य ठरले. चौथ्या कसोटीत १०७ धावा मोजून केवळ २ गडी बाद करण्यात यश आलेल्या ओव्हर्टनला डच्चू मिळणे अपेक्षित होते. परंतु, स्टोक्सच्या दुखापतीमुळे संघाच्या समतोलासाठी इंग्लंडला दुसरा बदल करावा लागला. रॉयला वगळल्यामुळे सलग दुसर्‍या कसोटीत ज्यो डेन्ली इंग्लंडच्या डावाची सुुरुवात करणार आहे. मधल्या फळीत कर्णधार ज्यो रुट, जोस बटलर, जॉनी बॅअरस्टोव यांची असातत्यपूर्ण कामगिरी इंग्लंडसाठी डोकेदुखी ठरत आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सातत्याने अपयशी ठरत असल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ भक्कम सलामीला मुकत असला तरी स्टीव स्मिथ व मार्नस लाबुशेन ही दुकली दोन्ही संघांमधील मुख्य फरक ठरत आहे. त्यामुळे या दोघांना झटपट बाद करण्यात इंग्लंडचे गोलंदाज यशस्वी ठरले तरच ‘साहेबांना’ मालिका बरोबरीत सोडडविणे शक्य होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ मालिकेत २-१ असा आघाडीवर असून इंग्लंडने शेवटचा सामना जिंकला तरीसुद्धा ‘ऍशेस’ ऑस्ट्रेलियाचकडे राहणार आहे.

इंग्लंड ः ज्यो डेन्ली, रॉरी बर्न्स, ज्यो रुट, बेन स्टोक्स, जॉनी बॅअरस्टोव, जोस बटलर, सॅम करन, ख्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर, जॅक लिच व स्टुअर्ट ब्रॉड .
ऑस्ट्रेलिया (संभाव्य) ः डेव्हिड वॉर्नर, मार्कुस हॅरिस, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅथ्यू वेड, मिचेल मार्श, टिम पेन, पॅट कमिन्स, पीटर सिडल, जोश हेझलवूड व नॅथन लायन.
सामन्याची वेळ दुपारी ३.३०