क्षणचित्रं… कणचित्रं…चौकट

0
42
  • प्रा. रमेश सप्रे

काय सुंदर कल्पना आहे! धर्म-अर्थ-काम-मोक्ष या चार पुरुषार्थांची चौकट व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनासाठी कल्याणकारी आहे. अशीच चौकट चार वेदांची, चार आश्रमांची, चार वर्णांचीसुद्धा आहे. व्यवस्था म्हणून अशा चौकटी आवश्यक असतात.

‘क्षणचित्रं… कणचित्रं…’ या ललितलेखमालेत शीर्षकातल्या वस्तूविषयी जी माहिती आपण मिळवतो त्यात असतात ‘कणचित्रे’, तर त्यानिमित्तानं आपण ज्या घटना, प्रसंग पाहतो ती असतात ‘क्षणचित्रे.’ असो.

  • चौकट म्हणजे चार बाजू असलेली आकृती, वस्तू, फ्रेम. या चार बाजू बहुधा आयताकार (रेक्टँग्युलर) किंवा चौरसाकार (स्क्वेअर) असतात. कलात्मक प्रकारात चारही बाजू वेगवेगळ्या लांबीच्या, जाडीच्या, रुंदीच्या असू शकतात. हेच पहा ना-
  • एका चित्रकारानं चित्र काढलं. ते नवचित्रकलेचं उदाहरण होतं. एका प्रदर्शनात त्यानं ते स्पर्धेसाठी मांडलं. दर्शक (प्रदर्शन पाहणारे रसिक) येत होते. चित्रासमोर थांबत होते. पुढे जात होते. थांबून त्या चित्राचा अर्थ लावण्याचा वा शोधण्याचा प्रयत्न करत होते. काहीही कळत नव्हतं तरीही ‘अहाहा, किती सुंदर! किती सूचक! किती प्रतीकात्मक!’ असे उद्गार काढून चित्रासमोरून हालत होते. विशेष म्हणजे त्या वर्षीचा पहिला पुरस्कार त्याच चित्राला मिळाला. ओळीनं चार वर्षं त्या चित्रकाराला पुरस्कार मिळत राहिला. पाचव्या वर्षी मात्र त्यानं भागच घेतला नाही. कारण विचारल्यावर तो उद्गारला, ‘चौकटीला चारच बाजू असतात ना?’ याचा अर्थ, त्यानं दरवर्षी तेच ‘नवचित्र’ चौकटीची बाजू बदलून टांगलं होतं आणि त्याला पारितोषिक मिळालं होतं. यातील विनोद सोडा, चौकटीच्या चार बाजू ध्यानात ठेवूया.
  • गीतरामायण रंगात आलं होतं. तसं पहिलंच गीत चालू होतं- ‘कुशलव रामायण गाती…’ शेवटी शेवटी शब्द आले-
    ‘पुरुषार्थाची चारी चौकट| त्यात पाहता निजजीवनपट|
    प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट| प्रभुचे लोचन पाणावती॥
    काय सुंदर कल्पना आहे! धर्म-अर्थ-काम-मोक्ष या चार पुरुषार्थांची चौकट व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनासाठी कल्याणकारी आहे. अशीच चौकट चार वेदांची, चार आश्रमांची, चार वर्णांचीसुद्धा आहे. व्यवस्था म्हणून अशा चौकटी आवश्यक असतात. त्यातून भेदाभेद, उच्चनीच भाव निर्माण होणे हा दैवदुर्विलास नि आपलं करंटेपण. असो.
  • दिनदर्शिका, पंचांग यांतील मुहूर्तांमध्ये घराला, वास्तूला चौकट बसवण्यासाठीचे मुहूर्त दिलेले असतात. अर्थ उघड आहे- वास्तू पूर्ण झाल्यावर गृहप्रवेश करताना नि विविध कामांसाठी बाहेर जाताना या चौकटीतूनच जावे लागते. नवजात बालक जसे चौकटीतून घरात प्रवेश करते, तसेच आजी-आजोबांचे मृतदेहही याच चौकटीतून बाहेर काढले जातात. चौकट एखाद्या स्थितप्रज्ञ मुनीसारखी सारे व्यवहार शांतपणे पाहत असते.
  • जरा अवघड संदर्भ पण आपल्याला परिचित असा. वक्रोक्ती हा भाषेचा एक अलंकार आहे. त्याला इंग्रजीत ‘इन्युएंडो’ म्हणतात. याचं उत्कृष्ट उदाहरण देताना चौकटीचा उल्लेख केला जातो. जसं- एखादा कलाकार विचारतो, ‘कसं वाटतं माझं चित्र?’ याला उत्तर ‘चौकट (फ्रेम) किती छान आहे!’ असं देणं म्हणजे चित्रापेक्षा चौकट चांगली आहे असं म्हणणं. असो.
  • चौकटींचा जगप्रसिद्ध खेळ म्हणजे बुद्धिबळ (चेस्). या चौसष्ट चौकटीत उंट, घोडे, हत्ती यांच्याबरोबरच प्यादी, वझीर, राजा असे सारेजण आपल्या चालीत चालत असतात. खरं म्हणजे खेळाडू त्यांना चालवत (खेळवत) असतात. असाच एक बुद्धिबळपटू राजदरबारातील सर्व बुद्धिबळपटूंचा पराभव करतो. राजा खूश होऊन त्याला बक्षीस मागायला सांगतो. तो अजिंक्य खेळाडू म्हणतो, ‘जास्त काही नाही, बुद्धिबळ पटावरच्या पहिल्या चौकटीत एक तांदळाचा दाणा ठेवा, दुसर्‍या घरात दोन दाणे, तिसर्‍यात चार दाणे असं करत चौसष्ट ‘घरं’ भरून तांदूळ मला दिले जावेत.’ राजा म्हणतो, ‘एवढेच काय? आणखी काहीतरी माग.’ यावर तो बुद्धिबळपटू म्हणतो, ‘एवढंच बक्षीस द्या.’ पुढे पुढे सर्वांना आश्‍चर्य वाटते. कारण चौसष्ट घरं फक्त बुद्धिबळ पटावरील चौकटीच नव्हत्या तर अक्षरशः घरं म्हणजे गोदामं होती. राज्यातील सर्व तांदळाचे साठे त्या खेळाडूला द्यावे लागले. आहे की नाही चौकटींची गणिती किमया!
  • एका चित्रकलेच्या संस्कार वर्गात चौकटीचं विलक्षण महत्त्व मार्गदर्शक व्यक्तींनी चांगलं स्पष्ट केलं. या वर्गातला संस्कार होता- ‘ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार?’ सृष्टीत, विश्‍वात सर्वत्र चित्रसौंदर्य भरून ओतून वाहतंय. सकाळ-संध्याकाळचा आकाशातला दिव्य संधिप्रकाश (ट्वायलाइट), ऊन-पावसात दिसणारं आकाश, मंडपावरचं तोरणच जणू असं इंद्रधनुष्य, काळे ढग, आसमंत लख्ख करणारी आकाशातून कोसळणारी वीज, पृथ्वीवर थुईथुई नाचणारा मोर, उंच पर्वतातून रोरावत कोसळणारे धबधबे, वार्‍यावर डोलणारी रंगीबेरंगी फुले नि हिरवीपिवळी पिकं ही सारी चित्रं चौकटीत बसणारी आहेत, हे कौशल्य त्या वर्गात शिकवलं गेलं. साध्या स्नानगृहातील बादली, आरसा, फणी, तेल, शांपूच्या बाटल्या, साबण, साबणाची डबी, टुथपेस्ट नि दातांचा ब्रश हे सारे विशिष्ट आकारांचे चौकोन किंवा चौकटी काढून कसे छान काढता येतात हे जेव्हा मुलं-शिक्षक-पालकांनी पाहिलं त्यावेळी सर्वांनाच आश्‍चर्य वाटलं. असो.
  • शेवटी एक मजेदार प्रसंग. जाड्या (हार्डी) नि रड्या (लॉरेल) यांच्या चित्रपटातील. जिन्यावर खिळे मारून दाराची दुरुस्ती करत असताना जाड्याचा तोल जातो नि तो गडगडत खाली येऊन खालचं दार फोडून रस्त्यावर येऊन पडतो. सारं दार त्याच्याबरोबर रस्त्यावर येतं. फक्त चौकट उरलेली असते. जाड्या उठतो. आपले धुळीत मळलेले कपडे स्वच्छ करतो नि चौकटीवर जाऊन टक्‌टक् (नॉक् नॉक्) करतो. रड्या वरून म्हणतो, ‘जसा बाहेर गेलास तसाच आत ये. दार आहेच कुठे? नुसती चौकटच उरलीय.’ यावर जाड्या गंभीरपणे म्हणतो- ‘मी सभ्य गृहस्थ (जंटलमन्) आहे. सार्‍या चालीरीती (मॅनर्स) पाळणारा आहे. टक्‌टक् करूनच घरात प्रवेश करणार!’ हे ऐकून रड्या हसत म्हणतो- ‘ओहो, वेलकम् जंटलमन्, कम इन प्लीज!’ यातला विनोदी भाग सोडा.
  • ‘हम दो, हमारे दो’ असं असलेल्या चौकटीचं एकूणच असं आहे हे चौकटपुराण! कुटुंबाची नव्हे कुटुंबसंस्थेची चौकट मात्र काळाच्या ओघात खिळखिळी झालीय याचं वाईट वाटतं.