क्रोएशियाकडून यजमान रशिया गारद

0
112

क्रोएशियाने यजमान रशियाचा पेनल्टी शूटआऊटवर ४-३ अशा गोलफरकाने पराभव करीत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या विजयामुळे क्रोएशियाने दुसर्‍यांदा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. यापूर्वी त्यांनी १९९८मध्ये अंतिम चार खेळाडूंत स्थान मिळविले होते.

फिश्त स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात निर्धारित ९० मिनिटांच्या खेळात दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत राहिले होते. ३१ व्या मिनिटाला रशियाचा स्टार खेळाडू डाव्या पायाच्या जोरकस फटक्याद्वारे गोल नोंदवित डेनिस चेरिशेव्हने रशियाला आघाडी मिळवून दिली. परंतु त्यांचा हा आनंद काही क्षणापुरतचा टिकाला. कारण लगेच ३९व्या मिनिटाला मँडझुकिकच्या पासवर आंद्रेज क्रॅमानिकने हेडरद्वारे गोल नोंदवित क्रोएशियाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. निर्धारित वेळेत गोलफलक १-१ असा बरोबरीत राहिल्यानंतर अतिरिक्त वेळेचा अवलंब करण्यात आला. त्यानंतर ही दोन्ही संघ २-२ असे बरोबरीत राहिले. व अतिरिक्त वेळेतही सामना २-२ असा अतिरिक्त वेळेच्या पहिल्या सत्रातील १००व्या मिनिटाला लुका मॉड्रिकडून मिळालेल्या पासवर दोमागोज विडाने हेडरद्वारे रशियन गोलक्षकाला चकवित क्रोएशियाला २-१ अशा आघाडीवर नेले. तर ११५व्या मिनिटाला मूळ ब्राझिलियन परंतु सध्या रशियातर्फे खेळणार्‍या मारिओ फर्नांडिसने हेडरद्वारे रशियाला २-२ अशा बरोबरीवर नेले.

अतिरिक्त वेळनंतरही दोन्ही संघ गोलबरोबरीत राहिल्याने रेफ्रीने निकालासाठी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला. त्यात विजयी ठरलेल्या क्रोएशियातर्फे इव्हान रॅकिटिक, दोमागोज विडा, लुका मॉड्रिक, मार्सेलो ब्राजोविक यांनी गोल नोंदविले. मातीओ कोवासिकची पेनल्टी शूट रशियाच्या गोलरक्षकाने अडविली. तर पराभूत रशियातर्फे डालेर कुझयायेव, सर्गेई इग्नेशेविच, ऍलन डोजगोएव यांनी प्रतिस्पर्धी क्रोएशियन गोलरक्षकाला चकवितले. तर मारिओ फर्नांडिस आणि फ्योडोर स्मोलोव्ह यांनी आपल्या पेनल्टी शूट वाया घालविल्याने यजमान रशियाचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच आटोपले. क्रोएशिया हा एकाच विश्वचषकात दोनवेळा पेनल्टी शूटआऊटवर जिंकणारा अर्जेंटिनानंतरचा दुसरा संघ ठरला. यापूर्वी अर्जेंटिनाने १९९०मधील विश्वचषकात युगोस्लाविया आणि इटालीवर पेनल्टी शूटआऊटमध्ये मात केली होती.