>> दुहेरीत गोव्याच्या तनिशा क्रास्टोची बाजी
भारताच्या कौशल धर्मामेर याने पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारताना काल रविवारी म्यानमार आंतरराष्ट्रीय सीरिज स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. थरारक झालेल्या अंतिम सामन्यात त्याने इंडोनेशियाच्या कारोनो कारोनो याचा पराभव केला. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात हॅट्झर आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकलेल्या मुंबईच्या २३ वर्षीय कौशलने काल पहिला गेम गामवल्यानंतर एक तास चाललेल्या लढतीत १८-२१, २१-१४, २१-११ असा विजय संपादन केला. कौशलला या स्पर्धेसाठी तिसरे मानांकन लाभले होते. उदय पवार बॅडमिंटन अकादमीत प्रशिक्षण घेत असलेला कौशल जागतिक क्रमवारीत १८७व्या स्थानावर आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय ज्युनियर सीरिज स्पर्धेत भारताने १९ वर्षांखालील गटात तीन सुवर्ण व तीन रौप्यपदकांना गवसणी घातली. अयान रशीद व तस्निम मीर यांनी मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत गलुह पुत्रा व झैनब सिराज यांचा २१-१६, २२-२४, २१-१९ असा पराभव केला. गोव्याच्या तनिशा क्रास्टोने अदिती भटसह खेळताना महिला दुहेरीत भारताच्याच त्रिसा जॉली व वर्षिणी यांचा २१-१७, २१-१७ असा पराभव केला. अव्वल मानांकित जोडीला द्वितीय मानांकितांना पराजित करण्यासाठी केवळ ३२ मिनिटे लागली. महिला एकेरीच्या अंतिम फेरीत बिगरमानांकित तस्निम मीरने द्वितीय मानांकित त्रिसा जॉलीला २१-१५, २१-१९ असा धक्का दिला. पुुुरुष एकेरीत वरुण कपूर याला मात्र नेपाळच्या प्रिन्स दहल याने २१-१९, २१-१९ असे हरविल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.