सौरभ वर्मा चॅम्पियन

0
117

भारताच्या सौरभ वर्मा याने काल रविवारी आपले सलग दुसरे बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुपर १०० विजेतेपद पटकावताना व्हिएतनाम ओपनच्या अंतिम फेरीत चीनच्या सून फेई शियांग याचा पराभव केला. द्वितीय मानांकित सौरभने शियांगला २१-१२, १७-२१, २१-१४ असे पराजित करत यंदाच्या मोसमातील आपले तिसरे अजिंक्यपद पटकावले. हा सामना ७२ मिनिटे चालला. याच मोसमात सौरभने हैदराबाद ओपन व स्लोवेनिया आंतरराष्ट्रीय सीरिज या स्पर्धा आपल्या नावे केल्या आहेत. जागतिक क्रमवारीत ३८व्या स्थानावर असलेला सौरभ आता ४००,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या ‘कोरिया ओपन वर्ल्ड टूर सुपर ५००’ या २४ ते २९ सप्टेंबर या कालावधीत चालणार्‍या स्पर्धेत आपले नशीब आजमावणार आहे.

कालच्या अंतिम फेरीत सौरभने पहिल्याच गेममध्ये ४-० अशी मोठी आघाडी घेतली होती. विश्रांतीपर्यंत त्याने ही आघाडी ११-४ अशी फुगवली. यानंतर त्याने फरक १५-४ असा केला. सून याने यानंतर पुनरागमनाचा जोरदार प्रयत्न केला. परंतु, मोठे अंतर भरून काढणे त्याला शक्य झाले नाही. दुसर्‍या गेममध्ये सून याने वेगवान खेळ दाखवत ८-० अशी सुरुवात केली. यानंतर ११-५ अंतर वाढवले. सौरभने कमालीची जिद्द दाखवली. परंतु, सूनच्या अगदी जवळ जाऊनही त्याला हा गेम गमवावा लागला. निर्णायक गेममध्ये सून ४-२ असा पुढे गेला होता. पण, सौरभने ब्रेकपर्यंत ११-७ अशी आघाडी घेतली. यानंतर आपला खेळ कायम राखत त्याने अजिंक्यपदाला गवसणी घातली.