कर्णधार विराट कोहलीचे तडफदार नाबाद अर्धशतक आणि लोकेश राहुलच्या ६२ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने हैदराबादेत झालेल्या पहिल्या वन-डेत वेस्ट इंडीजला ६ गड्यांनी पराभूत करीत तीन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
विंडीजकडून मिळालेले २०८ धावांचे लक्ष्य भारताने १८.४ षट्कांत २०९ धावा करीत गाठले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा केवळ ८ धावा जोडून खॅरी पियेरेच्या गोलंदाजीवर शिमरॉन हेटमायरकडे झेल देऊन देऊन परतला. परंतु त्यानंतर फलंदाजीस आलेल्या कर्णधार विराट कोहलीने संघाचा डाव सावरताना दुसर्या विकेटसाठी लोकेश राहुलच्या साथीत १०० धावांची भागीदारी केली. खॅरी पियेरेने जमलेली ही जोडी फोडली.
५ चौकार व ४ षट्कारांसह ४० चेंडूत ६२ धावांची अर्धशतकी खेळी केलेल्या राहुलला त्याने पोलार्डकरवी झेल बाद केले. त्यानंतर कोहलीने ऋषभ पंतच्या साथीत ४८ धावा जोडत संघाल विजया समिप आणले. पुन्हा एकदा खराब फटका खेळून पंत (१८ धावा) माघारी परतला. शेवटी विराट कोहलीने नाबाद खेळी करीत संघाला मालिकेतील पहिला सामना जिंकून दिला. अर्धशतकासाठी त्याला ६ धावा कमी पडल्या. आपल्या नाबाद खेळीत कोहलीने विंडीजची गोलंदाजी झोडपून काढताना ६ चौकार व ६ उत्तुंग षट्कारांसह ५० चेंडूत ९४ धावा जोडल्या. विंडीजकडून खॅरी पियेरेने २ तर शेल्डन कॉटरेल आणि कीरॉन पोलार्ड यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
तत्पूर्वी भारताच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे आणि शमरन हेटमायरच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना ५ गडी गमावत २०७ अशी धावसंख्या उभारली. विंडीजची सुरुवात खराब झाली. सलामीवीर लेंडन सिमन्सला (२) दीपक चहरने रोहित शर्माकरवी झेलबाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर एविन लुईसने १७ चेंडूतस ४०, ब्रँडन किंगने २३ चेडूंत ३१, शेमरॉन हेटमायरने ४१ चेंडूत ५६, कीरन पोलार्डने १९ चेंडूत ३७ आणि जेसन होल्डरने ९ चेंडूत २४ धावा करत संघाची धावसंख्या २०७ पर्यत नेली. भारताकडून युजवेंद्र चहलने ३६ धावांत २. तर दीपक चहर, वॉशिंग्टन सुंदर, रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
धावफलक
वेस्ट इंडीज ः लेंडल सिमेन्स झे. रोहित शर्मा गो. दीपक चहर २, एव्हिन लुईस पायचित गो. वॉशिंग्टन सुंदर ४०, ब्रँडन किंग यष्टिचित ऋषभ पंत गो. रविंद्र जडेजा ३१, शेमरॉन हेटमायर झे. रोहित शर्मा गो. युझवेंद्र चहल ५६, कीरॉन पोलार्ड त्रिफळाचित गो. युजवेंद्र चहल ३७, जेसन होल्डर नाबाद २४, दिनेश रामदीन नाबद ११.
अवांतर ः ६. एकूण २० षट्कांत ५ बाद २०७ धावा.
गडी बाद होण्याचा क्रम ः १-१३ (वेंडल सिमेन्स, १.२), २-६४ (एव्हिन लुईस, ५.४), ३-१०१ (ब्रँडन किंग, १०.१), ४-१७२ (शेमरॉन हेटमायर, १७.१), ५-१७३ (कीरॉन पोलार्ड १७.३)
गोलंदाजी ः वॉशिंग्टन सुंदर ३/०/३४/१, दीपक चहर ४/०/५६/१, भुवनेश्वर कुमार ४/०/३६/०, रविंद्र जडेजा ४/०/३०/१, युजवेंद्र चहल ४/०/३६/२, शिवम दुबे १/०/१३/०.
भारत ः रोहित शर्मा झे. शेमरॉन हेटमायर गो. खॅरी पियेरे ८, लोकेश राहुल झे. कीरॉन पोलार्ड गो. खॅरी पियेरे ६२, विराट कोहली नाबाद ९४, ऋषभ पंत झे. जेसन होल्डर गो. शेल्डन कॉटरेल १८, श्रेयस अय्यर झे. व. गो. कीरॉन पोलार्ड ४, शिवम दुबे नाबाद ०. अवांतर ः २३ धावा. एकूण १८.४ षट्कांत ४ बाद २०९ धावा.
गडी बाद होण्याचा क्रम ः १-३० (रोहित शर्मा, ३.२), २-१३० (लोकेश राहुल, १३.३), ३-१७८ (ऋषभ पंत, १६.२), ४-१९३ (श्रेयस अय्यर १८).
गोलंदाजी ः शेल्डन कॉटरेल ४/०/२४/१, जेसन होल्डर ४/०/४६/०, खॅरी पियेरे ४/०/४४/२, हेडन वॉल्श २/०/१९/०, केस्रिक विल्यम्स ३.४/०/६०/०, कीरॉन पोलार्ड १/०/१०/१
राहुल बनला हजारी
भारतीय संघाला पहिल्या टी-२०त विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका निभावलेल्या लोकेश राहुलने आपल्या ६२ धावांच्या अर्धशतकी खेळी दरम्यान १००० धावांचा पल्लाही गाठला. या सामन्याआधी हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी राहुलला केवळ २६ धावांची गरज होती. ती त्याने पार केली. अशी कामगिरी करणारा राहुल भारताचा सातवा फलंदाज ठरला आहे. याआधी विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी, युवराज सिंह यांनी अशी कामगिरी केली आहे. दरम्यान सर्वात कमी डावांमध्ये टी-२० क्रिकेटमध्ये हजार धावांचा टप्पा पूर्ण करणार्या फलंदाजांच्या यादीतही राहुलला तिसरे स्थान मिळाले आहे.