>> औषध महानियंत्रक संस्थेची लस वापरण्यास मान्यता
>> डब्ल्यूएचओकडून स्वागत
काल रविवारी भारतीय औषध महानियंत्रक संस्थेने (डीसीजीआय) कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लशींना अंतिम मंजुरी दिली. या व्यतिरिक्त झायडस कॅडिलाची लस झायकोव्ह-डीच्या तिसर्या टप्प्यातील चाचणीही मंजुरी देण्यात आली. भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोवॅक्सिन या दोन्ही लशींना आपत्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली असल्याची माहिती डीसीजीआयने पत्रकार परिषदेद्वारे दिली.
मिळालेल्या या मान्यतेमुळे लशीकरणाच्या प्रक्रियेतला सर्वात मोठा टप्पा पार पडला आहे. शनिवारीच देशभरात ड्राय रनही पार पडला.
दोन्ही लशी सुरक्षित
या दोन्ही लशी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे डीसीजीआयने सांगितले. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी यापूर्वीच लशीचे पाच कोटी डोस तयार असल्याचे स्पष्ट केले असून पहिल्या टप्प्यात अडीच कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्यता आहे. जर सुरक्षेशी संबंधित थोडा जरी संशय असता करी कोणत्याही गोष्टीला मंजुरी दिली नसती, असे डीसीजीआयचे संचालक व्ही. जी. सोमानी यांनी म्हटले आहे. ही लस ११० टक्के सुरक्षित असून हलका ताप, वेदना आणि ऍलर्जीसारखे काही दुष्परिणाम प्रत्येक लशीसाठी एक सर्वसामान्य बाब असल्याचे सोमानी यांनी म्हटले आहे. काही मूर्खपणाच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहनही सोमानी यांनी केले.
डब्ल्यूएचओकडून स्वागत
भारतात लशीला आपत्कालीन मंजुरी मिळाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) स्वागत करत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या आशिया क्षेत्राच्या विभागीय संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी म्हटले आहे.
पुनावालांकडून आनंद व्यक्त
कोविशिल्ड लशीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने मंजुरी दिल्यानंतर सीरम इन्सिस्ट्यूटचे अदर पुनावाला यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. लस संकलनासाठी सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाने पत्करलेल्या सर्व अडचणींवर अखेर यश मिळाले. कोविशिल्ड लस सुरक्षित आणि परिणामकारक असून पुढील काही आठवड्यात लोकांना देण्यासाठी तयार असल्याचे पुनावाला म्हणाले. त्याचबरोबर पुनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, बिल गेट्स, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आयसीएमआर, बायो टेक्नॉलॉजी विभाग, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, ऑक्सफर्ड विद्यापीठ, ऍस्ट्राझेनेका यांच्यासह संबंधित संस्थांचे आभार मानले.
लशींच्या सुरक्षेबाबत
चिंता नाही ः एम्स
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लशींच्या सुरक्षेबाबत चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. ह्या दोन्ही लशी अनेक टप्प्यांमधून गेल्या असल्याची प्रतिक्रिया एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली.
हा दिवस देशासाठी एक महत्वाचा दिवस आहे, तसेच ही नव्या वर्षाची चांगली सुरुवात देखील आहे, असे डॉ. गुलेरिया म्हणाले. या दोन्ही लशी भारतातच तयार झालेल्या असून त्या स्वस्त व टोचण्यासाठीही सोप्या आहेत. असे डॉ. गुलेरिया म्हणाले. आपत्कालीन स्थितीत जर अचानक रुग्णांची संख्या वाढत असेल आणि लशीकरणाची आवश्यकता निर्माण झाली असेल, तर भारत बायोटेकच्या लशीचा वापर केला जाईल असे डॉ. गुलेरिया म्हणाले. तसेच लशीच्या पुढील चाचण्या सुरूच राहतील. यामुळे आकडे मिळत राहतील. एकदा का हे आकडे आले की मग यावर अधिक विश्वासाने चर्चा करू असे डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले.
कोविशिल्ड लस सरकारसाठी
२०० तर इतरांना १००० रुपये
कोविशिल्ड लशीचे उत्पादन होत असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटचे अदार पुनावाला यांनी कोरोना लशीच्या किमतीबाबत घोषणा केली आहे. पुनावाला यांनी किमतीबाबत, सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होत असलेली ऑक्सफर्डची कोरोनावरील लस सरकारला २०० रुपयांमध्ये दिली जाईल. तर सर्वसामान्य जनतेलाही लस एक हजार रुपयांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल असे सांगितले.
कॉंग्रेसकडून आक्षेप
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लशींना वापरण्यासाठी मंजुरी मिळाल्यानंतर कॉंग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर आणि जयराम रमेश यांनी आक्षेप घेत चिंता व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय मानकांना बाजूला सारून या लशींना हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. हे धोकादायक ठरू शकते, असे थरूर आणि जयराम रमेश यांनी म्हटले आहे. लशीची चाचणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत तिचा वापर टाळायला हवा असे थरूर यांनी म्हटले आहे. तर जयराम रमेश यांनी देखील भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीला मंजुरी देण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अभिमानाचा दिवस ः मोदी
दोन्ही लशींना मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा असून आमच्या सर्व परिश्रमी वैज्ञानिक आणि इनोव्हेटर्सना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी, कोरोनाविरोधी ज्या दोन लशींना अंतिम मंजुरी मिळाली आहे, त्या दोन्ही लशी भारतात तयार झालेल्या आहेत. यावरून आत्मनिर्भर भारताची निर्मिती करण्यासाठी आमचे वैज्ञानिक किती परिश्रम घेत आहेत हे दिसते असे म्हटले आहे. लशींना डीसीजीआयच्या मंजुरीमुळे एक स्वस्थ आणि कोविडमुक्त भारताच्या मोहीमेस बळ मिळेल. कठीण परिस्थितीत असाधारण सेवाभावासाठी आम्ही डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, शास्त्रज्ञ, पोलीस कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि सर्व कोरोना योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. देशवासीयांचे जीवन वाचवण्यासाठी आम्ही सैदव त्यांचे आभारी राहू, असे म्हणत मोदींनी कोरोना योद्ध्यांचे कौतुक केले आहे.