कोरोना लशीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याबाबत दिल्ली येथे तज्ज्ञांच्या समितीची काल बैठक झाली. या बैठकीत सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड या लशीला भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या लशीला मान्यता देण्यात आल्याने आता लशीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता असून पहिल्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस दिली जाणार असल्याचा अंदाज आहे.
कोरोना लशीच्या तयारासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. फायझर, भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट या तिन्ही संस्थांनी कोरोनावरील लशीबाबत व ती लस दिल्यानंतर होणारे परिणाम याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर आता सीरमच्या कोविशिल्ड लशीला आपत्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. कोविशिल्ड लशीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्याबाबत समितीच्या याआधीही दोन बैठका झाल्या आहेत. त्या बैठकांमध्ये लस उत्पादक कंपन्यांकडून काही माहिती मागवण्यात आली होती.
ब्रिटनने याच आठवड्यात ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेकाच्या कोरोना लशीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे. ऑक्सफर्डने भारतीय कंपनी सीरमशी करार केला आहे. सीरमने आतापर्यंत लशीचे ५ कोटी डोस तयार केले आहेत. भारतात ही लस कोविशिल्ड नावाने उपलब्ध होईल. ही लस साठवून ठेवण्यास सोपी असून ती सामान्य फ्रीजमध्ये ठेवता येऊ शकते. फायझरची लस साठवण्यासाठी उणे ७० अंश सेल्सियस तपमान तर मॉडर्नच्या लशीसाठी डीप फ्रीजची गरज लागते. त्यामानाने कोविशिल्डची लस साठवून ठेवण्यास सोपी आहे.
आजपासून ड्राय रन
दरम्यान, आज दि. २ जानेवारीपासून भारतातील प्रत्येक राज्यात ड्राय रन करण्यात येणारआहे. यासाठी तयाराची आढावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत एका बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्रप्रदेश या चार राज्यांमध्ये कोरोना लशीकरणाचे ड्राय रन यशस्वीरित्या घेण्यात आले आहेत.
आजच्या ड्राय रनसाठी राज्यात तयारी पूर्ण
राज्यातील सुमारे १८ हजार फ्रंटलाईन आरोग्य कर्मचार्यांना पहिल्या टप्प्यात कोविड लस दिली जाणार आहे. राज्य प्रशासनाने आज दि. २ जानेवारीच्या कोविड लशीकरणाच्या ड्राय रनसाठी आवश्यक तयारी पूर्ण केली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिली.
कोविड लशीकरणाच्या ड्राय रनसाठी आरोग्य खात्याने तीन आरोग्य केंद्रांची ठिकाणे निश्चित केली आहेत. या ठिकाणी २५ आरोग्य कर्मचार्यांना लशीचा डोस दिला जाणार आहे. ज्या कर्मचार्यांची लशीकरणासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना एसएमएस संदेशाद्वारे माहिती देण्यात आली आहे. २ जानेवारीला सकाळी १० ते १२ या वेळेत कोविड लशीकरणाचे प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. लशीकरणासाठी येणार्यांची दोन काउंटरवर पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर लस दिली जाणार आहे. कोविड लस दिल्यानंतर संबंधितांवर देखरेख ठेवली जाणार आहे. कुणालाही त्रास होत असल्यास त्याबाबत माहितीची नोंद केली जाणार आहे. या लशीकरणाबाबतचा अहवाल संबंधितांना सादर केला जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी
कोरोनाने एकही बळी नाही
राज्यात नववर्षाच्या पहिल्या दिवशी एकाही कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद नाही. तर, नवीन ६९ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार १३५ एवढी झाली असून सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ९३० झाली आहे.
राज्यातील आणखीन ७८ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या ४९ हजार ४६६ एवढी आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७४ टक्के एवढे आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ७३९ एवढी आहे.
चार लाख स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी
राज्यात आत्तापर्यंत ४ लाख ६९९ स्वॅबच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली असून त्यात ५१ हजार १३५ स्वॅबचे नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. चोवीस तासांत कोविड प्रयोगशाळेत नवीन १४६३ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन ४६ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारल्याने अशा रुग्णांची एकूण संख्या २६ हजार ७८४ एवढी झाली आहे.
इस्पितळात नवीन २८ कोरोना रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.
नवीन कोरोना नसल्याने ७ जणांना डिस्चार्ज
नाताळ आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी ब्रिटनहून गोव्यात आलेल्या ७ जणांच्या लाळेचे नमुने पुणे येथे चाचणीसाठी पाठवले होते. त्यांच्यामध्ये कोरोनाच्या नवीन रुपाची कोणतीही लक्षणे आढळून आली नसल्याने त्या सात जणांना मडगावच्या कोविड इस्पितळातून घरी पाठवण्यात आले आहे अशी माहिती कोविड इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विश्वजित फळदेसाई यांनी सांगितले. या सातजणांना मडगाच्या इएसआय इस्पितळात दाखल करण्यात आले होते. सध्या या इस्पितळात ब्रिटनहून गोव्यात आलेले ५१ जण कोरोनाबाधित सापडले आहेत.
आमदार प्रतापसिंह राणे
कोरोना पॉझिटिव्ह
पर्येचे आमदार तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना तसेच त्यांच्या पत्नी विजयादेवी राणे यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत रा यांनी दिली.