कोविड त्सुनामीकडे?

0
30

ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे संपूर्ण जगभरामध्ये ‘कोविड त्सुनामी’ अवतरण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने काल व्यक्त केली आहे. आतापर्यंत युरोप – अमेरिकेत नवे कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले होते. तेथे आता कोरोना संसर्गाचे पूर्वीचे सारे विक्रम मोडीत निघाले आहेत आणि भारतामध्येही बघता बघता गेल्या आठवड्याभरात रुग्णसंख्या कैक पटींनी वाढत चालली आहे. गोव्यामध्ये गेल्या तीन दिवसांत कोरोनाचा जो उत्पात चालला आहे, तो येणार्‍या नववर्षाच्या उत्साहावर झाकोळ टाकणारा आहे. गोव्याचा कालचा टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट तब्बल ७.२ टक्क्यांवर गेलेला आहे. दिल्ली, मुंबईसह बहुतेक सर्व बड्या शहरांमध्ये कोरोना रुग्णसंख्याही पुन्हा एकवार फार मोठी उसळी घेताना दिसत आहे.
कोरोनाच्या या नव्या प्रकोपाची खबरदारी म्हणून बहुतेक राज्यांच्या सरकारांनी तातडीने कडक निर्बंध लागू केले. दिल्ली सरकारने ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅन लागू करून सार्वजनिक उपस्थितीवर कडक निर्बंध घातले. मुंबईत तर महाराष्ट्र सरकारने येत्या सात जानेवारीपर्यंत १४४ कलम लागू करून नववर्ष रजनींवर बंदी घातली आहे. आपल्या गोव्यात मात्र सक्रिय रुग्णसंख्या साडेआठशेच्या वर आणि टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट सात टक्क्यांवर पोहोचून देखील सरकारने वरवरच्या उपाययोजनांखेरीज काही केलेले नाही. ‘गोवा हे पर्यटनाभिमुख राज्य असल्याने नववर्ष स्वागत रजनींवर निर्बंध घालू शकत नाही’ असा आव सरकारने आणला आहे, परंतु देशातील इतर राज्येच का, अगदी युरोप अमेरिकेनेही वाढती रुग्णसंख्या पाहून नाताळ आणि नववर्षाच्या कार्यक्रमावर निर्बंध जारी केलेले असताना गोव्याच्याच पर्यटनक्षेत्राला असे काय सोने लागून गेले आहे की स्थानिक जनतेच्या जिवापेक्षा पर्यटनाचे हित सरकारला प्यारे वाटावे? हे दुसरे तिसरे काही नाही, तर पर्यटन व्यावसायिकांचे विशेषतः कॅसिनोंचे हितसंबंध जोपासण्याचा आणि आपली लोकप्रियता टिकवण्याचा सत्ताधार्‍यांचा सवंग सोस आहे. हजारो पर्यटकांचे लोंढे राज्यात अनिर्बंध फिरत असताना आणि कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चाललेली दिसताना सरकार कठोर निर्णय घेण्यात जी चालढकल करते आहे, वेळकाढूपणा करते आहे तो जनतेच्या अंगलट येऊ शकतो. सरकारच्या पदराखालील तज्ज्ञ समितीने गणिती सूत्रे घालून दिली असली तरी ज्या वेगाने संसर्ग वाढतो आहे तो पाहिल्यास हा वेग सामान्य जनतेला चिंतित करणारा आहे.
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये गोव्यामध्ये हाहाकार माजला. कुटुंबेच्या कुटुंबे बाधित झाली. कित्येकांचा प्राणवायूविना तडफडून बळी गेला. त्या सगळ्या कटू आठवणी पुन्हा जाग्या होऊ नयेत यासाठी सरकारने अधिक सक्रियता दाखवण्याची आवश्यकता आहे. रस्तामार्गे राज्यात येणार्‍या पर्यटकांना व परप्रांतीयांना कोविड लसीकरणाचा पुरावा सीमांवर दाखवावा लागतो आहे, परंतु ती सरकारची नव्हे, तर उच्च न्यायालयाची कृपा आहे. जगभरात ओमिक्रॉनचे थैमान सुरू होताच विदेशस्थ गोमंतकीयांना आपली मायभूमी आठवली आणि ते गोव्यात परतू लागले. परंतु विमानतळावर जरी त्यांची तपासणी झाली तरी तेथे निगेटिव्ह अहवाल येऊनही कालांतराने ते बाधित होण्याची आणि संसर्ग फैलावण्याची शक्यता असते. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी हेच वास्तव काल बोलून दाखवले आहे. गोव्यात जो ओमिक्रॉनचा पहिला आठ वर्षीय रुग्ण सापडला तो सतरा डिसेंबरला गोव्यात आलेला होता. त्याला ओमिक्रॉनची बाधा झाल्याचे समजायलाच दहा दिवस लागले. तोवर तो आणि त्याचे कुटुंब किती लोकांत मिसळले कल्पना करवत नाही. असे शेकडो विदेशस्थ गोवेकर गोव्यात आलेले आहेत. भरीस भर म्हणून हजारो देशी – विदेशी पर्यटक आपापल्या राज्यांतील निर्बंधांपासून पळ काढून नववर्षाचा धुमाकूळ घालण्यासाठी गोव्यात डेरेदाखल झालेले आहेत. गोव्याला विमानमार्गे जोडणार्‍या दिल्ली, मुंबई, बेंगलुरू आदी सर्व शहरांमध्ये कोरोना रुग्णसंसर्ग फार मोठ्या प्रमाणात फैलावत असताना गोवाच त्यापासून मुक्त राहील असे मानणे हास्यास्पद ठरेल.
कोरोना फैलाव होत असूनही राजकीय पक्षांना निवडणुका आणि मोठमोठ्या प्रचारसभा हव्या आहेत असे काल निवडणूक आयोगाने सांगितले. ह्या निवडणुकांचा प्रचार, नववर्ष सोहळे, लग्नसराई आणि पर्यटन यांच्यापोटी जनतेचे प्राण धोक्यात येणार नाहीत ना? सरकारने आणखी वेळ काढू नये. येत्या तीन तारखेपासून सुरू होणार्‍या शाळा व सर्व परीक्षा पुढे ढकलाव्यात वा ऑनलाइन कराव्यात. रात्रीची संचारबंदी, जमावबंदीसारखे कठोर उपाय तातडीने योजावेत आणि नववर्षात येऊ घातलेल्या संकटाला वेळीच अटकाव करावा. पुन्हा एकवार आपली हलगर्जी दाखवू नये!