>> मॉक ड्रीलअंतर्गत गोमेकॉतील साधनसुविधांचा आढावा
राज्यात गेल्या काही दिवसांत दररोज सरासरी 100 कोविडबाधित रुग्ण आढळत आहेत. सध्या कोविडमुळे इस्पितळात दाखल झालेल्या रुग्णांपैकी कोणीही ऑक्सिजनच्या आधार द्यावा लागलेला नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविडबाबत ठरवून दिलेल्या सर्व प्रोटोकॉलचे राज्य सरकार पालन करत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. कोविडशी लढा देण्यासाठी गोवा राज्य सज्ज आहे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मॉक ड्रीलअंतर्गत बांबोळी येथील गोमेकॉमध्ये कोविड उपचारांच्या साधनसुविधांचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना काल केले.
गोवा गोमेकॉच्या टीमला आवारात जिनोम सिक्वेन्सिंग मशीन कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले आहेत आणि त्याबद्दल आरोग्य सचिवांना सूचित केले आहे. राज्यातील कोविड परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अँटिजेन चाचणी वापरून सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. आवश्यक असल्यास आरटीपीसीआर चाचणी केली जाते आणि जिनोम क्रमवारी प्रोटोकॉल आणि एसओपीनुसार केली जाते, असेही राणे यांनी सांगितले.
आम्ही मागील अनुभवांनुसार कठोर पावले उचलली आहेत. प्रत्येक समस्येचे निराकरण केले जाईल याची खात्री करून घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील बहुतेक भागांमध्ये कोविड प्रकरणांमध्ये वाढ होत असताना, अनेक राज्यांनी पुन्हा मास्क अनिवार्य केले आहे, तर काहींनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे, असेही राणे यांनी सांगितले.