>> मुख्यमंत्र्यांची अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी ग्वाही
राज्यात कोविड महामारीच्या काळात ज्या कुटुंबातील कर्ता व्यक्ती बळी पडला होता, त्या कुटुंबातील नातेवाईकांचे आर्थिक मदतीसाठीचे प्रलंबित अर्ज गणेश चतुर्थीपूर्वी निकालात काढले जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना काल विधानसभेत दिली.
कोविड महामारीमध्ये कुटुंबातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या नातेवाईकांचे आर्थिक मदतीसाठी अनेक अर्ज प्रलंबित आहेत. सदर अर्ज लवकर निकालात काढावेत. तसेच सरकारच्या विविध खात्याच्या योजनेच्या लाभार्थ्यांना वेळेवर मानधन वितरित करावे, अशी मागणी मायकल लोबो यांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी गणेश चतुर्थीपूर्वी सदर अर्ज निकालात काढले जातील, अशी ग्वाही दिली.
राज्य सरकारच्या विविध खात्यांना महसूल वृद्धीची सूचना करण्यात आली आहे. राज्यातील नगरपालिका, ग्रामपंचायती सुध्दा सरकारी अनुदानावर अवलंबून आहेत. त्यांनाही महसूल वृद्धीसाठी प्रयत्न सुरू करण्याची सूचना केली आहे. राज्यातील जे रस्ते खराब झाले आहेत, त्यांची दुरुस्ती कंत्राटदारांकडून मोफत करवून घेतली जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वर्ष २०२२-२३ चा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी कमी वेळ मिळाला, तरीही सर्वांच्या सहकार्यातून सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला. सर्व खात्यांना आवश्यक प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कोविड महामारीमध्ये कुटुंबातील कर्ता व्यक्ती गमावलेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून २ लाख रुपये आर्थिक साहाय्य केले जात आहे. तसेच केंद्र सरकारकडून ५० हजार रुपयांचे सहाय्य केले जात आहे. आर्थिक सहाय्यासाठीचे काही अर्ज प्रलंबित आहेत. हे अर्ज निकालात काढण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.