कोविडमुळे काही प्रकल्प रखडले : डॉ. प्रमोद सावंत

0
16

गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळा (जीएसआयडीसी)तर्फे हाती घेण्यात आलेल्या काही प्रकल्पांची कामे ही कोविड महामारीमुळे रखडली असल्याचा खुलासा काल महामंडहाचे चेअरमन या नात्याने काल विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. मात्र, या प्रकल्पांपैकी काही प्रकल्पांची कामे प्राधान्यक्रमाने हाती घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महामंडळच्या रखडलेल्या १० कोटी रुपयांवरील प्रकल्पांमध्ये काणकोण येथील रवींद्र भवन, कुडचडे येथील रवींद्र भवनचे दुरुस्तीकाम, मेरशी येथील नियोजित उत्तर गोवा जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे बांधकाम, मडगाव येथील आयटीआय आदी प्रकल्पांचा समावेश असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

काणकोण येथील रवींद्र भवनचे काम २०१७ साली सुरू झाले होते आणि ते २०१९ साली पूर्ण व्हायचे होते. कुडचडे रवींद्र भवनचे दुरुस्तीकाम २०१५ साली सुरू झाले होते व ते २०१७ साली पूर्ण व्हायचे होते. मेरशी येथील नियोजित सत्र न्यायालयाचे काम २०१६ साली सुरू झाले होते व ते २०१८ साली पूर्ण होणार होते. मडगाव येथील आयटीआयचे काम २०१९ साली सुरू झाले होते व ते २०२० साली पूर्ण होणार होते, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
कोविड काळात लॉकडाऊन तसेच आर्थिक मंदीमुळे ही कामे पूर्ण करणे शक्यच नव्हते, असेही ते म्हणाले.