>> विरोधकांची फलक झळकवीत घोषणाबाजी
काल राज्यपालांचे अभिभाषण आटोपताच राज्यपाल सभागृहातून निघून जाताना विरोधी आमदारांनी ‘आम्हाला कोळसा नको’ असे लिहिलेले फलक त्यांना दाखवीत जोरदार घोषणाबाजी केली. या विधानसभा अधिवेशनात कोळसा प्रश्नावर चर्चा व्हायला हवी असा आग्रह विरोधकांनी धरला आहे.
सरकारवर टीका करताना विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते चर्चिल आलेमाव, कॉंग्रेस नेते लुईझिन फालेरो व मगो नेते ढवळीकर यांनी राज्यपालांच्या सभागृहात अभिभाषण न वाचता ते पटलावर ठेवून निघून जाण्याच्या कृतीविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.
विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी हे अधिवेशन पूर्णकालिन अधिवेशन व्हावे अशी विरोधकांची मागणी होती असे स्पष्ट केले. गेल्या वर्षी केवळ ७ दिवसांचे अधिवेशन झाले होते. त्यामुळे हे अधिवेशन जास्त दिवसांचे व्हावे अशी आमची मागणी होती असे सांगून आजचा दिवस अभिभाषणाचा होता. आता २७, २८ व २९ असे तीनच दिवस शिल्लक राहिल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांनी १४ लक्षवेधी सूचना मांडलेल्या आहेत. रोज किमान पाच लक्षवेधी सूचना चर्चेसाठी घ्याव्यात अशी विरोधकांनी सूचना केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यानी रोज तीन चर्चेसाठी घेण्याचे मान्य केल्याचे त्यांनी सांगितले.
गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी सांगितले की, कोळशाच्या प्रश्नावरून संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरलेली आहे. त्यामुळे सर्वांत प्रथम कोळशाच्या प्रश्नावर चर्चा व्हायला हवी. राज्यपालांच्या अभिभाषणात कोळशाच्या प्रश्नाचा का उल्लेख नाही, असा सवालही त्यांनी केला. विजय सरदेसाई यांनी राज्यपालानी सभागृहात अभिभाषण न वाचल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली असता राज्यपालांनी काय करावे व काय करू नये याविषयी विधानसभेत कुणीही चर्चा करू शकत नसल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.