कोलकाता पीडितेला न्याय द्या!

0
8

पद्म पुरस्कार विजेत्या 70 डॉक्टरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार आणि तिच्या हत्येच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. त्यातच आता पद्म पुरस्कार विजेत्या 70 डॉक्टरांनी पीडितेला न्याय द्या, अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले आहे.

कोलकाता येथील आर. जी. कार रुग्णालयात एका महिला डॉक्टरची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. या घटनेचा देशभरातून निषेध केला जातो आहे. या घटनेवरुन देशभरातील डॉक्टर हे त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचे शनिवारी पाहायला मिळाले. आता पद्म विजेत्या डॉक्टरांनी या घटनेवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.

पद्मविजेत्या डॉक्टरांनी काय म्हटले आहे पत्रात?
आ. जी. कार या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात घडलेली घटना अत्यंत भीषण आणि तितकीच चिड आणणारी आहे. आम्ही सगळे डॉक्टर्स पंतप्रधान नरेंद्र मोदींना ही विनंती करतो आहोत की या प्रकरणात तुम्ही जातीने लक्ष घातले पाहिजे. आरोग्य सेवा देण्याचे काम डॉक्टर करत असतात. अशात त्यांच्या सुरक्षेबाबत आणि खास करुन महिला डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत हा प्रश्न भेडसावतो आहे त्याची दखल घ्या आणि या प्रकरणातल्या दोषींना कठोरातली कठोर शिक्षा द्या, महिला डॉक्टरचा लैंगिक छळ, बलात्कार किंवा या प्रमाणे काही घटना घडल्या, तर कठोरातली कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी पद्म विजेत्या डॉक्टरांनी केली आहे.

एम्सचे डॉ. रणदीप गुलेरिया, मेदांता रुग्णालयाचे संचालक डॉ. नरेश तेहान, डॉ. हर्ष महाजन, फोर्टिसचे संचालक अशोक सेठ, एम्सचे माजी संचालक डॉ. बलराम भार्गव यांच्यासह 70 हून अधिक डॉक्टरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.