कोरोना लसीकरणासाठी ८ इस्पितळे निश्‍चित

0
255

>> मुख्यमंत्री घेणार आज उच्चस्तरीय बैठकीद्वारे आढावा

>> १६ पासून लसीकरण सुरू

राज्यात कोरोना लसीकरणासाठी आठ इस्पितळे निश्‍चित करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत राज्यातील कोरोना लसीकरणाच्या कामाचा एका उच्चस्तरीय बैठकीत आज सोमवारी आढावा घेणार आहेत.
राज्यात कोरोना लसीकरणाचे दोन ड्राय रन यशस्वीरित्या घेण्यात आले आहेत. त्यानंतर सरकारने लसीकरणासाठी आठ इस्पितळे निश्‍चित केली आहे. त्यात ५ सरकारी इस्पितळ आणि तीन खासगी इस्पितळाचा समावेश आहे.
राज्यात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे अठरा हजार कोरोना फ्रंटलाईन कर्मचार्‍यांना कोरोना लस दिली जाणार आहे. आरोग्य खात्याने लसीकरणाबाबत सविस्तर आराखडा तयार केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशपातळीवरील कोरोना लसीकरणाबाबत सोमवारी सर्व राज्यांशी मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत कोरोना लसीकरणासंबंधीची उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. या बैठकीला आरोग्य व इतर खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यासाठी सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. आरोग्य खात्याने कोरोना लसीकरणाचा सविस्तर आराखडा तयार केला असून उच्चस्तरीय बैठकीत आराखड्यावर विचारविनिमय केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन आरोग्य कर्मचार्‍यांना लस दिली जाणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ज्येष्ठ नागरिक व इतरांना लस दिली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

काल ६६ पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू
राज्यात चोवीस तासांत एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर, नवीन ६६ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ८५६ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ८३२ एवढी झाली आहे.

राज्यात चोवीस तासांत एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून आत्तापर्यंत कोरोनाने ७४७ जणांचा बळी घेतला आहे. बांबोळी येथे गोमेकॉमध्ये उपचार घेणार्‍या ओशेल येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात चोवीस तासांत आणखी १०० कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ५०,२७७ एवढी झाली असून कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९५ टक्के एवढे आहे.
कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या नवीन ६ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन २५ कोरोना रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.
राज्यात चोवीस तासांत नवीन १५२३ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. तपासण्यात आलेले ४.३३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

मडगाव आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ८७ एवढी आहे. पणजी उच्च आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ४७ रुग्ण आहेत. वास्को केंद्राच्या क्षेत्रात ४५ रुग्ण, फोंडा आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ६१ रुग्ण, पर्वरीतील सध्याच्या रुग्णांची संख्या ४९ झाली आहे.

राज्यातील कासारवर्णे, कोलवाळ, मये, बाळ्ळी, सांगे, शिरोडा, धारबांदोडा या आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या दहापेक्षा कमी आहे. तर, इतर एकवीस भागातील आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील कोरोनाच्या सध्याच्या रुग्णांची संख्या पन्नासपेक्षा कमी आहे.