राज्यातील कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीचा आदेश महसूल खात्याचे सचिव संजय कुमार यांनी जारी केला आहे.
कॅसिनो ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवावे. कॅसिनोमध्ये मास्क, सॅनिटायझर्स, थर्मल स्क्रिनिंग आदी कोविड नियमावलीचे पालन करावे. कोविड लशीचे डोस घेतलेल्या किंवा निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्या व्यक्ती व कर्मचार्यांना प्रवेश द्यावा, असे म्हटले आहे.
सिनेमागृह, सभागृहे, रिव्हर क्रुझ आदी ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवावीत. स्पा, मसाज पार्लर, रेस्टॉरंट, पब, मद्य दुकान, लग्न सोहळे, व्यायामशाळा अशा ठिकाणी कोविड नियमावलीचे पालन करावे. आंतरराज्य प्रवाशांसाठी दोन्ही डोस किंवा ७२ तासांपूर्वी घेतलेले कोविड चाचणी प्रमाणपत्र सक्ती करण्यात आले आहे. शिक्षण खात्याकडून विद्यालयांसाठी गरज भासल्यास वेगळी एसओपी जारी केली जाणार आहे.
चोवीस तासांत १७० नव्या बाधितांची नोंद
>> राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ५६७
राज्यात नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन १७० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. मात्र एकाही कोरोना बळीची नोंद नाही. राज्यातील बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ५.२५ टक्क्यांवर पोहोचले आहे.
राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ५६७ एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ३५२० एवढी आहे.
गेल्या चोवीस तासांत ३२३७ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील १७० नमुने बाधित आढळून आले.
राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी ४८ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६८ टक्के एवढे खाली आले आहे. कोरोनाची लक्षणे जाणवल्याने २ बाधितांना इस्पितळात दाखल करून घेण्यात आले आहे. तर, बरे झालेल्या तिघांना इस्पितळातून घरी पाठविण्यात आले आहेत.
पर्यटकांकडून कोविड नियमांचा भंग
राज्यात नाताळ व नववर्षानिमित्त पर्यटकांच्या संख्येत वाढ झालेली आहे. पर्यटकांकडून कोविड नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारकडून ३ जानेवारीनंतर कोरोना नियंत्रणासाठी निर्बंध लादण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
नववर्ष पार्ट्यांना सशर्त परवानगी ः मुख्यमंत्री
राज्यात नववर्षानिमित्त हॉटेलमध्ये पार्टी, रेस्टॉरंटमध्ये जाण्यासाठी पूर्ण लसीकरण किंवा निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार आहे. यासंबंधीचा आदेश जिल्हाधिकार्यांकडून जारी केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. नाताळ व नववर्षानिमित्त हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये पर्यटक व नागरिक गर्दी करतात. या गर्दीमुळे कोरोना महामारीचा फैलाव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, कोरोना रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. नागरिकांनी लवकर लसीकरण करून घ्यावे. नाताळ व नववर्षाच्या काळात कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाहीत. रात्रीची संचारबंदीसुद्धा लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिक व पर्यटकांनी नियमांचे पालन करून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
- – महसूल खात्याचा आदेश
- – कॅसिनोला ५० टक्के क्षमतेने मान्यता
- – सिनेमागृहे, विवाह समारंभांना ५०% उपस्थितीस मान्यता
- – चोवीस तासांत १७० कोरोनाबाधित
- – कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन
- – आंतरराज्य प्रवाशांसाठी दोन्ही डोस किंवा ७२ तासांपूर्वीचे प्रमाणपत्र अत्यावश्यक
- – गरज भासल्यास शाळांसाठी वेगळी एसओपी