कोरोना ः गोमेकॉत ३० खाटांचा विशेष विभाग

0
180
????????????????????????????????????

>> आरोग्य सचिव संजय कुमार यांची माहिती; कृती दलाच्या बैठकीत चर्चा

चीनमध्ये ज्या कोरोना विषाणूचा फैलाव झालेला आहे त्या विषाणुचा संसर्ग झालेला रुग्ण गोव्यात सापडला तर त्याच्यापासून अन्य लोकांना संसर्ग होऊ नये तसेच संसर्ग झालेल्या रुग्णावर कसे उपचार करावेत व एकूणच परिस्थिती कशी नियंत्रणात ठेवावी याचा निर्णय घेण्यासाठी गोवा सरकारने स्थापन केलेल्या कृती दलाची काल आरोग्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

काल झालेल्या पहिल्याच बैठकीत राज्यात कोरोना विषाणूचा रुग्ण सापडल्यास कोणकोणती उपयायोजना करावी. तसेच या विषाणूचा अन्य लोकांना संसर्ग होऊ नये यासाठी कोणती पावले उचलावीत याबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गोमेकॉत विशेष विभाग
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण जर गोव्यात आढळले तर त्यांच्यावर उपचार करता यावेत यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात ३० खाटांचा एक विशेष विभाग तयार ठेवला आहे. त्यात अत्यवस्थ अशा रुग्णांसाठी दोन खाटांचा अतिदक्षता विभागही असेल, अशी माहिती कुमार यांनी दिली.
कृती दलाने विमानतळ व बंदर अधिकार्‍यांशी याप्रश्‍नी चर्चा केल्याचे कुमार म्हणाले. गोव्यात चीनमधून थेट विमानसेवा नाही. तरीही दाबोळी विमानतळावर थर्मल स्क्रिनिंगची सोय उपलब्ध करून दिली जावी, अशी मागणी केली आहे. ज्या राज्यात चीनमधून थेट विमानसेवा आहे अशा राज्यांतील विमानतळांना भारत सरकारने थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था उपलब्ध करून दिली असल्याचे कुमार यांनी सांगितले.

काही राज्यांत संशयित रुग्ण
भारतातील काही राज्यांत कोरोना विषाणूंचे संशयित रुग्ण आढळले असले तरी अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. ज्या संशयित रुग्णांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते त्या सर्व रुग्णांच्या नमुन्यांचा अहवाल नेगेटिव्ह आलेला असून एकालाही कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती कुमार यांनी यावेळी दिली.

भारत अजून सुरक्षित;
घाबरण्याचे कारण नाही
कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेला एकही रुग्ण अजून भारतात सापडलेला नाही. त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. या विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये तीव्र सर्दी, ताप, श्‍वसनाचे विकार (न्यूमोनिया) अशी लक्षणे दिसून येतात. वेळीच उपचार न झाल्यास मुत्रपिंडे निकामी होणे आदी व्याधी होतात.
या विषाणूंवर सध्या तरी औषध नाही. पण तसे असले तरी वेळीच उपचार करून या विषाणुंची लागण झालेल्या कित्येक रुग्णांचे प्राण चीनमध्ये वाचवण्यात आले आहेत. दरम्यान, राज्य सरकारने स्थापन केलेली कृती समिती परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे संजय कुमार म्हणाले.

एक संशयास्पद रुग्ण आढळला ः गोमेकॉत उपचार
कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेला एक संशयित रुग्ण राज्यात आढळला असून तो चीनमधून आल्याचे आढळून आले आहे. त्याचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवून देण्यात आले आहेत. सध्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात त्याच्यावर उपचार चालू आहेत. त्याच्या घशाला संसर्ग झाला असल्याचे आढळून आले आहे. मात्र, म्हणून तो कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेला रुग्ण आहे असे म्हणता येणार नाही. साध्या सर्दीमुळेही घशाला संसर्ग होत असतो, असे कुमार यांनी स्पष्ट केले. चीनमधील वोहान येथून तो आलेला आहे.