कोरोनाने आणखी तिघा जणांचा मृत्यू

0
20

>> बळींची संख्या ३८३८ वर; १६८ रुग्णांची नोंद

गेल्या रविवारी राज्यात दोघा जणांचा कोविडमुळे मृत्यू होण्याची घटना ताजी असतानाच काल मंगळवारी आणखी तिघा जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला. या मृत कोविड रुग्णांना अन्य गंभीर स्वरूपाचे आजार होते, असे आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे. दरम्यान, एकूण कोविड बळींची संख्या ३८३८ वर पोहोचली आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला असून, गेल्या २४ तासांत राज्यात १६८ नवे कोरोना रुग्ण सापडले. गेल्या २४ तासात १३८१ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यापैकी १६८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे आढळून आले. तसेच गेल्या २४ तासांत १५६ जण कोविडमुक्त झाले असून, सक्रिय कोविड रुग्णांची संख्या ९३२ एवढी आहे.

मंगळवारी कोविडमुळे मृत्यू झालेल्या तिघा जणांपैकी एक पुरुष रुग्ण हा ४७ वर्षांचा असून, तो माडेल-मडगाव येथील रहिवासी होता. या इसमाची मूत्रपिंडे निकामी झाली होती. या स्थितीत त्याला कोविड आणि न्युमोनियाही झाल्याने त्याचा मृत्यू झाला. आजारपणामुळे त्याला कोविडचा एकही डोस घेता आला नव्हता.
मृतांपैकी दुसरी व्यक्ती ही रिवण-सांगे येथील एक ३८ वर्षांची महिला असून, तिला कावीळ झाली होती. तिने कोविडचे दोन डोस घेतले होते. कोविडमुळे मृत्यूमुखी पडलेल्या तिसर्‍या व्यक्तीची ओळख पटलेली नसून, ५० च्या आसपास वय असलेल्या या रुग्णाला मृतावस्थेत मडगाव येथील हॉस्पिसियो इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्याची शवचिकित्सा झाली नसल्याचे हॉस्पिसियो इस्पितळाने स्पष्ट केले आहे. तिघांपैकी एकाचा व्हिक्टर हॉस्पिटलमध्ये, एकाचा गोमेकॉत, तर एका रुग्णाला मृतावस्थेत हॉस्पिसिओत दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी केले आहे.