कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या फेरतपासणीची सोय करणार

0
280

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही

कोरोना बाधेतून बरे झालेल्या रुग्णांच्या पुन्हा तपासणीसाठी राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सामाजिक आरोग्य केंद्रांत व्यवस्था केली जाणार आहे. राज्यातील कोरोना बांधितांची संख्या नियंत्रणात आल्यानंतर ही वैद्यकीय सेवा सुरू केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

राज्यातील कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुरू करण्यात आलेली कोविड केअर सेंटर्स कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याशिवाय बंद केली जाणार नाहीत. काही कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण नसल्याने ती तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून गरज भासल्यास ही कोविड केअर सेंटर सुरू केली जातील, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यातील सौम्य लक्षणे असलेले कोरोना रुग्ण होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारत असल्याने कोविड केअर सेंटरमधील रुग्णांची संख्या कमी दिसून येत आहे. केवळ ३० ते ४० टक्के क्षमतेने कोविड केअर सेंटर चालतात. त्यामुळे एकदम कमी रूग्ण संख्या असलेली कोविड केअर सेंटरमधील कामकाज तात्पुरते स्थगित ठेवले जात आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.