‘कोरोना’च्या आशीर्वादाचे- असेही अभ्यंग… अवती-भवती

0
225
  • अंजली आमोणकर

या लॉकडाऊनपायी मिळालेल्या जबरदस्तीच्या कैदेत सर्वांना ‘मनाच्या अभ्यंगाचा’ आशीर्वाद मिळून गेला. एकमेकांचा यथेच्छ सहवास मिळाल्यामुळे, मनातल्या सांदीकोपर्‍यात साचून राहिलेली गैरसमजाची जळमटं दूर झाली.

अचानक सामान आवरताना पर्समध्ये राहून गेलेली उटण्याची चार पाकिटं हाती आली. या दिवाळीला मजा म्हणून प्रत्येकानेच उटणं विकत आणल्याने ती उरली होती. मी सरळ ती बाथरूममध्ये ठेवून दिली. ‘‘उटणं फक्त दिवाळीलाच लावावं असं कुठंय?… चला, रोज रोज उटणं लावून संपवूया…!’’ चिरंजीव उद्गारले.
रोजची सुवासिक आंघोळ (साबण सुवासिक, शॅम्पू सुवासिक, पावडर-लोशन सुवासिक अन् शेवटी परफ्यूम तर असतातच) करून-करून मंडळी कंटाळलेली दिसताहेत. म्हणून उटण्याचा भाव एकदम वधारला. तसाच तो कधीमधी अचानक बागेतल्या फुलांच्या गजर्‍याचाही वधारतो (रेडिमेड हातात पडला तर). व्यक्तिमत्त्व उठून दिसणे- हे त्या सर्व सुवासिक गोष्टींनी अचूक साधते- हे अगदी बरोब्बर! शिवाय टिपटॉप व्यक्तिमत्त्वाशिवाय आजकाल कोणतीच कामं साधत नाहीत हेही खरं! पण केवळ उटणं म्हणजे अभ्यंगस्नान नव्हे. आधी तेलमालिश अन् मग गरम पाण्यानं उटणं लावून स्नान म्हणजे अभ्यंग- जो पूर्वीच्या काळी सर्व पिढ्या करायच्याच व आताही आयुर्वेदानंतर सर्व पार्लर व स्पामध्येही दिला जातो. शरीराचं एकप्रकारचं सर्व्हिसिंगच आहे हे! पॅडिक्यूअर, मॅनिक्यूअर, मसाज, स्टीमबाथ हे तर पूर्वीही होते व आताही आहेत. हे सर्व करून झोप, मरगळ, उदासी, खिन्नता, दुःख, कंटाळा, आळस घालवून आपण नित्यनेमाने ताजेतवाने होत नव्या-नव्या आव्हानांना सामोरे जात ती पेलून दाखवतो.

आपण ही जेवढी मेहनत शरीरशुद्धीवर घेतो, तितकीच मेहनत मनशुद्धीवर घेतो का? मनाला अभ्यंगस्नान घालतो का? महिन्या-पंधरा दिवसांतून एकदा तरी घराला अभ्यंग घालतो, जाळी-जळमटं काढतो, फॅन-दिवे पुसतो, सोफा कव्हर- पडदे बदलतो, जमलं तर कपाटंही लावतो. गाडीला व घरातील इतर वाहनांना वेळच्या वेळी सर्व्हिसिंगला देऊन आणतो. त्यांचेही अभ्यंग होते. झाडांची छाटणी करतो, त्यांना खतमाती घालतो, पाचोळा काढतो- बागेला अभ्यंग होतो. न चुकता लग्नं, वाढदिवस, वास्तुशांत, ऍनिव्हर्सर्‍या करतो. आहेराची देवाण-घेवाण होते. जेवणं, पार्ट्या होतात. याने नात्यांना अभ्यंगस्नान मिळते. शेवटी मन तसंंच उरतं. अनेकदा मनाविरुद्ध वागल्याने हताश, कोमेजलेलं, अन्याय सोसल्याने मरायला टेकलेलं, समाजाचं अतिरेकी वागणं बघून धास्तावलेलं, लायकी नसताना इतरांनी मिळवलेला मान- आदर- श्रीमंती- श्रेष्ठता बघून खंतावणारी ही मनं! मनाला अभ्यंगाची शंभर टक्के गरज आहे.

मी सतत पॉझिटिव्ह असतो, मी पटकन चिडत नाही, असं म्हटलं की आपण स्वतःला संभावित- सुसंस्कृत ठरवतो. पण तेवढंच पुरेसं आहे का? मनाच्या कानाकोपर्‍यातील जळमटं कधीच नाही का काढायची? ही जळमटं अनास्थेची असतील, विलंबाची असतील, निष्क्रियतेची असतील, पण ती हुरूपरूपी काठीने गुंडाळून खाली उतरवलीच पाहिजेत, मंथनरूपी जाळीने, नेटने त्यांचे निराकरण केले पाहिजे. मधून-मधून टप्प्याटप्प्याने का होईना, पण मनाला असे अभ्यंग दिल्याने मनाचे आरोग्य सुधारण्यास केवढी मदत होईल! आपल्यातल्या कमतरता ओळखून दूर करणे, समोरच्या व्यक्तींशी जास्तीत जास्त सुसंवाद घडवणे, उदार मनाने दुसर्‍याची चूक पोटात घालायला शिकणे, पण गरज तिथे जशास तसे देणे- हे सर्व मानसिक स्वास्थ्यासाठी गरजेचे आहे. स्वतःस वेळ देणे, मर्यादा न उल्लंघणे व इतरांनाही त्या उल्लंघू न देणे अशा मानसिक अभ्यंगाची आपल्याला नितांत गरज आहे व तो कोणत्याही पार्लर वा स्पामध्ये मिळणार नाही असे नाही का वाटत तुम्हाला? मात्र या लॉकडाऊनपायी मिळालेल्या जबरदस्तीच्या कैदेत सर्वांना ‘मनाच्या अभ्यंगाचा’ आशीर्वाद मिळून गेला. एकमेकांचा यथेच्छ सहवास मिळाल्यामुळे, मनातल्या सांदीकोपर्‍यात साचून राहिलेली गैरसमजाची जळमटं दूर झाली. एकमेकांकडे पुरेसं लक्ष दिलं गेल्यामुळे वर्तमान गरजा, आवडी-निवडी, मनोरंजनाचे ट्रेन्ड अशा अनेक इतरांसंबंधीच्या कौटुंबिक गरजा नीट लक्षात आल्या. तेवढ्या काळात ज्यांचे वाढदिवस येऊन गेले ते कुटुंबीयांसोबत- औक्षण करून- मस्त साजरे झाले. घराला चक्क ‘घरपण’ आले. वृद्ध मंडळीही सर्वांना अवतीभवती पाहून बेहद्द खूश झाली. अनेकांच्या एकटेपणाला सुरुंग लागला. हे घरादाराचेच अभ्यंग झाले ना? मनोरंजनाची सर्वच साधने बंद असल्यामुळे पत्त्यांचे डाव कितीतरी वर्षांनी परत खेळले गेले. आरडा-ओरडा, हसणं, चिटिंग करणं, मग परत आरडाओरड यानं घर गजबजून गेलं. काही कामधंदाच उरला नसल्याने आपोआपच मोठ्यांचे टेक्निकल प्रॉब्लेम्स सोडवण्यात लहानांना उत्साह वाटला.
जरी हे बदल चिरस्थायी नसले तरी मोठेपणी त्यांची मजा सर्वांनी एकत्रितपणे घेतली, हे आयुष्याचे मौलिक अभ्यंग ठरेल. कायम सर्वांना लक्षात राहील. कळत-नकळत ‘सहवासदानाचे’ महत्त्वही कुठेतरी खोल मनात रूजलेलं असेल. त्याला कोंब फुटायचे तेव्हा फुटोत… पण सध्यातरी याच अभ्यंगावर आपण संतुष्ट राहूया. कसं?