>> चीनमधील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यांना सूचना
चीनमध्ये पुन्हा झालेला कोरोनाचा विस्फोट आणि अमेरिकेतून नोंदवलेल्या नवीन कोरोना प्रकरणांमुळे केंद्र सरकारने राज्य सरकारांना कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी करत, इन्साकॉग नेटवर्कद्वारे कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारांचा मागोवा घेण्याची सूचना केली असून, नवीन कोरोना प्रकरणांच्या जिनोम सिक्वेन्सिंगवर भर देण्यास सांगितले आहे.
जपान, अमेरिका, कोरिया, ब्राझील आणि चीनमध्ये अचानक वाढलेली कोरोना प्रकरणे पाहता, इन्साकॉग नेटवर्कद्वारे प्रकारांचा मागोवा घेण्यासाठी कोरोनाबाधित नमुन्यांचा संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंग तयार करणे आवश्यक आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
सर्व कोरोना प्रकरणांचे नमुने दररोज सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तयार केलेल्या इन्साकॉग जिनोम सिक्वेन्सिंग लॅबमध्ये पाठवले जावेत, अशीही सूचना करण्यात आली आहे.
जागतिक स्तरावर दर आठवड्याला सुमारे ३५ लाख कोविड प्रकरणे नोंदवली जात आहेत, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. भारतात काल सकाळी ११२ नवीन कोविड प्रकरणे नोंदवली गेली. तसेच आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ३,४९० पर्यंत घसरली आहे.
नवे प्रकार शोधण्यास मदत
जिनोम सिक्वेन्सिंगमुळे देशात प्रसारित होणारे नवीन कोरोना प्रकार वेळेवर शोधणे शक्य होईल आणि त्यासाठी आवश्यक सार्वजनिक आरोग्य उपाययोजना हाती घेणे सुलभ होईल, असेही राजेश भूषण यांनी म्हटले आहे. जिनोम सिक्वेन्सिंग हे नवीन विषाणूची वैशिष्ट्ये ओळखण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी वापरले जाणारे तंत्र आहे.