कोरोनाची तमा न बाळगता देशी पर्यटकांची गोव्याकडे रीघ

0
240

>> प्रमुख महामार्गांवर वाहतुकीची कोंडी; कोरोना फैलावाची भीती

नाताळ, सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी देशी पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात दाखल होत आहेत. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यातील विविध भागांत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. पर्यटकांकडून मास्क, सामाजिक अंतर आदी नियमांचे पालन केले जात नाही. सरकारी यंत्रणा नियमांचे उल्लंघन करणार्‍यावर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

गोव्यात कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसल्याने देशाच्या विविध भागांतून पर्यटक दाखल होत आहे.
राज्यात येणारे पर्यटक स्वतःची वाहने घेऊन येत आहेत. तसेच काही देशी पर्यटक बसगाड्या व इतर वाहनांतून येत आहेत. त्यामुळे राज्यातील वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. राज्यात आधीच मोठ्या प्रमाणात वाहने आहेत. त्यात पर्यटकांच्या वाहनांची भर पडल्याने सर्वत्र वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या वाहतूक कोंडीचा त्रास स्थानिक नागरिक व पर्यटकांना सहन करावा लागत आहे.

राज्यातील पर्यटनस्थळे, समुद्र किनार्‍यांवर पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. समुद्र किनार्‍यावर पर्यटकांकडून कोविड नियमावलीची पायमल्ली केली जात आहे. कोविड नियमांचे उल्लंघन करणार्‍यावर कारवाई केली जात नसल्याने नियमांचे उल्लंघन करणार्‍या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे.

पणजी शहर परिसरात सुध्दा पर्यटकांकडून कोविड नियमावलीचे पालन केले जात नाही. पणजी महानगरपालिकेने यापूर्वी कोविड नियमावलीचे पालन न करणार्‍या पर्यटकांवर कारवाईची मोहीम राबविली होती. कोविड नियमावलीचे पालन न करणार्‍यावर कारवाईचा अधिकारी मामलेदार कार्यालय, पोलीस, नगरपालिका, पंचायतीच्या सचिवांना देण्यात आलेला आहे. तथापि, या यंत्रणांकडून योग्य प्रमाणात कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे.

राज्यात ब्रिटनमधून आलेले काही पर्यटक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. युकेमधून मोठ्या संख्येने विदेशी पर्यटक दाखल झालेले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे काम सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने गंभीर दखल घेऊन कोविड नियमावलीचे पालन न करणार्‍यावर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. गोव्यात पर्यटकांच्या संख्येत घट होऊ नये म्हणून निर्बंध घातले जात नाहीत. राज्यात कोरोना रूग्णाचे प्रमाण कमी होत आहे. कोविड नियमावलीचे उल्लंघन केल्यास पुन्हा कोरोना रुग्णांच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यातील हॉटेलमध्ये रात्रीच्या वेळी होणार्‍या संगीत, नृत्य पार्ट्यांमध्ये कोविड नियमावलीचे उल्लंघन केले जात आहे. रात्रीच्या वेळी होणार्‍या पार्ट्यांमध्ये कोविड नियमावलीचे पालन करण्याची सूचना करण्यात आलेली आहे. तथापि, संबंधितांकडून या सूचनेच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.