कोरोनाचा राज्यात पुन्हा उद्रेक

0
155

>> २४ तासांत ५६२ रुग्ण, मंगळवारी तिघांचा मृत्यू

राज्यात कोरोना विषाणूचा काल पुन्हा उद्रेक दिसून आला. काल मंगळवारी कोरोनाचे नवे तब्बल ५६२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे सध्याची कोरोनाची रुग्णसंख्या ४८८८ एवढी झाली आहे. तर कोरोनाचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ६३३४२ एवढी झाली आहे. तसेच काल राज्यात तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाने बळी गेलेल्यांची एकूण संख्या सध्या ८५३ एवढी झाली आहे.

काल राज्यात २३६ जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ५७,६०१ एवढी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.९४ टक्के झाले असल्याची माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

मडगावात ५०० च्यावर रुग्ण
सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्या आता मडगावात झाली असून ती ५२३ एवढी झाली आहे. पर्वरीत त्या खालोखाल ४६० रुग्णसंख्या झाली आहे. तर फोंड्यात ३६९, पणजीत ३४०, म्हापशात ३३०, कांदोळीत ३११, कुठ्ठाळी २७५, वास्को २३९, चिंबल १७७, शिवोली १६५, कासावली १५५, डिचोली ११३, खोर्ली ११०, साखळी १०७ तर पेडण्यात १०४ रुग्ण आहेत.

काल खात्यातर्फे २५०४ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली.
कोरोना संसर्ग झालेल्या १७,१३४ जणांनी राज्यातील इस्पितळात उपचार घेतले आहेत. तर ३३,८९४ जणांनी घरी विलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत. आतापर्यंत ५,७७,१२१ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे.
परराज्यातून आलेल्यांतील १८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने ३०७ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला. तर ९७ नवे रुग्ण इस्पितळात विलगीकरणात राहिले आहेत.

उत्तर गोव्यातील कोविड सेंटरमध्ये एकूण खाटांची संख्या २७५ असून २५८ खाटा रिक्त आहेत. तर दक्षिण गोव्यातील खाटांची संख्या १४४ असून तिथे ७२ खाटा रिक्त असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.