कॉलेज परिसरातील काळ्या काचांच्या गाड्यांविरुध्द लवकरच मोहीम

0
75

गोव्यातील महाविद्यालयात जे विद्यार्थी तसेच अन्य कोण काळ्या आरशांच्या चारचाकी गाड्या घेऊन येत असतात त्यांच्याविरुध्द लवकरच मोहीम उघडण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस विभागातील सूत्रांनी काल सांगितले. चारचाकी गाड्यांच्या आरशांवर काळ्या फिल्म्स बसवणे हे मोटर वाहन कायद्याच्या विरोधात आहे. गाड्यांच्या आरशांवर काळ्या फिल्म्स बसवून कॉलेज युवतींचे अपहरण करण्याच्या घटना देशातील विविध राज्यात घडत असतात. या पार्श्‍वभूमीवर अशा काळ्या आरशांच्या गाड्यांवर कारवाई करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतलेला असून त्यासंबंधीची कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आले असल्याचे वाहतूक पोलीस विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले.
जे विद्यार्थी अथवा अन्य युवक कॉलेज आवारात अशा काळ्या आरशांच्या गाड्या घेऊन येतील त्यांच्या गाड्या ताब्यात घेऊन काळ्या फिल्म्स काढण्यात येतील तसेच या गाड्या घेऊन येणार्‍यांना तालांवही देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. अशा गाड्या घेऊन येणार्‍यांकडे गाडीची सगळी कागदपत्रे तसेच गाडी चालवण्याचा परवाना आहे की नाही. चालक दारूच्या नशेत आहे की काय, तो गाडी वेगाने हाकत होता की काय, त्याच्या गाडीवर गाडीचा क्रमांक योग्य प्रकारे लिहिण्यात आलेला आहे की नाही यावर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे.