कॉंग्रेस सोडणार नसल्याची सोपटेंची घोषणा हवेत विरली!

0
112

पणजी
आपली राजकीय कारकीर्द भाजपातून सुरू करणारे मांद्रे मतदारसंघाचे माजी आमदार दयानंद सोपटे पुन्हा भाजपात दाखल झाल्याने त्यांनी मुख्यमंत्रिपदाची ऑफर आली तरी कॉंग्रेस पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा देणार नाही, अशी केलेली घोषणा अखेर हवेत विरली आहे. सोपटे यांच्या या घोषणाबाजीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
सोपटे हे सुरुवातीला २००७ साली पेडणे मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी तत्कालीन कॉंग्रेसचे बलाढ्य उमेदवार तथा तत्कालीन आमदार जितेंद्र देशप्रभू यांचा पराभूत केले होते. पहिल्याच प्रयत्नात विजयी होऊनही पक्ष बहुमतापासून दूर राहिल्याने त्यांना विरोधी बाकांवर बसावे लागले होते. त्यानंतर त्यांनी आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या प्रयत्नामुळे २०१२च्या निवडणुकीपूर्वी भाजपचा त्याग करून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण हा निर्णय त्यांना महागात पडला. तत्कालीन भाजपचे आमदार प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावे लागले. त्यानंतर २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत मांद्रे मतदारसंघातून कॉंग्रेसच्या तिकिटावर भाजपचे नेते तथा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पराभव करून ते जायंट किलर ठरले होते.