कॉंग्रेस – भाजप परस्परांची ‘बी’ टिम : ‘आप’

0
107

कॉंग्रेस व भाजप हे एकमेकांची ‘बी टीम’ असून आतापर्यंत दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या घोटाळ्यांवर पांघरुण घालण्याचेच काम केले आहे, असा आरोप काल आम आदमी पक्षाने पत्रकार परिषदेत केला. राज्यात कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर असताना सेझ घोटाळा, खाण घोटाळा, जमीन घोटाळे असे कित्येक घोटाळे झाले. मात्र, २०१२ साली सत्तेवर आल्यापासून भाजप सरकारने या एकाही घोटाळ्याची चौकशी न करता घोटाळ्यात हात असलेल्या कॉंग्रेस नेत्यांना आतापर्यंत अभयच दिले. त्यामुळे कॉंग्रेसचे नेतेही आता सत्ताधारी भाजप सरकार करीत असलेल्या घोटाळ्यांकडे दुर्लक्षच करीत आलेले आहे, असे आम आदमी पार्टीचे सहनिमंत्रक दिनेश वाघेला यांनी काल सांगितले.

२००६ साली राज्यात मोठा सेझ घोटाळा झाला होता. सेझ कंपन्यांसाठी जमिनी देताना मोठा गैरव्यवहार झाल्याचे मुंबई उच्च न्यायालयानेही स्पष्ट केले होते. उच्च न्यायालयाने याप्रकरणी तपासकामाचेही आदेश दिले. मात्र, या घोटाळ्यातील नेत्यांवर कारवाई करायची सोडून कॉंग्रेस नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठीच या घोटाळ्याचा वापर झाल्याचे वाघेला म्हणाले. कॉंग्रेस व भाजप याच्यातील हातमिळवणीमुळेच सेझ कंपन्यांना देण्यात आलेली ३८ लाख चौ. मी. एवढी जमीन अजूनही सरकारच्या ताब्यात येऊ शकलेली नाही. किंबहुना ती ताब्यात घेण्यास सरकारलाही आता रस राहिलेला नसून म्हणूनच आता सरकार या प्रश्‍नी न्यायालयाबाहेर तोडगा काढण्याची भाषा करू लागले असल्याचे वाघेला म्हणाले. त्याद्वारे सरकार सेझ कंपन्यांना कवडीमोलात देण्यात आलेली अर्धी अधिक जमीन त्यांना देण्याचा प्रस्ताव ठेवू पाहत असून हे अत्यंत गैर असल्याचे वाघेला यांनी सांगितले. कॉंग्रेसच्या काही आमदारांनी तर थेट भाजपशी हातमिळवणी केलेली असून त्या बदल्यात त्यांना महामंडळे देण्यात आली असल्याचे वाघेला म्हणाले. कॉंग्रेस आमदार मॉविन गुदिन्हो यांना त्यानी भाजपशी हातमिळवणी केल्याने बक्षीस म्हणून दक्षिण गोवा नियोजन आणि विकास प्राधीकरणाचे अध्यक्षपद देण्यात आले असल्याचे वाघेला म्हणाले. याच गुदिन्हो यांच्यावर काही वर्षांपूर्वी मनोहर पर्रीकर यांनी वीज घोटाळा प्रकरणी एफआयआर दाखल केले होते. अशा एकमेकांशी हातात हात घालणार्‍या या भाजप व कॉंग्रेसला आम आदमीवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केेले. या सर्व घटनांवरून कॉंग्रेस व भाजप पक्ष हेच एकमेकाची बी टीम असल्याचे सिध्द होत आहे, असे वाघेला म्हणाले. आम आदमी पार्टी राज्यात क्रांती घडवून आणू पाहत असून पार्टीवर खोटे आरोप करून कुणीही क्रांती रोखू शकणार नसल्याचा विश्‍वासही वाघेला यांनी व्यक्त केला.