कॉंग्रेस जाहीरनाम्यात आश्‍वासनांची खैरात

0
104

कॉंग्रेस पक्ष राज्यात सत्तेवर आल्यास गोव्याला खास दर्जा प्राप्त करून देण्यासाठी कॉंग्रेस पक्ष केंद्र सरकारकडे भारतीय घटनेच्या लेखा व कलम ३७१ च्या सुधारणेसाठी गोवा विधानसभेत ठराव घेणार असल्याचे काल कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातून आश्‍वासन दिले. याद्वारे बिगर गोमंतकीयांना शेती आणि कूळांकडील जमीन विकण्यावर निर्बंध घालण्यात येतील, असा दावा करण्यात आला. कॉंग्रेसने जाहीरनाम्यात मुलभूत जीवनाचा हक्क, उदरनिर्वाहाचा हक्क, मालकी वा अधिकाराचा हक्क, जगण्याचा हक्क, दर्जेदार शिक्षणाचा हक्क, दर्जेदार जीवनाचा हक्क, आर्थिक स्वयंपूर्णतेचा हक्क, खास ओळखीचा हक्क, उत्तम प्रशासनाचा हक्क, गोवा संरक्षणाचा हक्क व अभिवचन अशी विभागणी केली असून युवकांसाठी वेगळा जाहीरनामा केला आहे.

कॉंग्रेस पक्षाने काल गोवा विधानसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यातून पक्ष सत्तेवर आल्यास राज्यातील दारिद्य्र रेषेखालील लोकांना ३ रु. प्रती किलो या दराने तांदूळ व २ रु. प्रती किलो दराने गहू व साखर ७ रु. दराने देण्याचीही घोषणा केली. वीज व पाणी दर खाली आणून ते २०१२ पूर्वी जेवढे होते तेवढेच ठेवण्याचे आश्‍वासन दिले आहे. तसेच दारिद्य्र रेषेखालील लोकांना वीज व पाणी मोफत देण्याचेही आश्‍वासन जाहीरनाम्यात आहे.
कूळ-मुंडकार दुरुस्ती रद्द
भाजप सरकारने कूळ-मुंडकार कायद्यात जी दुरुस्ती घडवून आणली आहे ती रद्द करण्यात येईल. धनगर समाजाचा अनुसूचित जमातींत समावेश केला जाईल. मांडवी नदीतील सर्व कॅसिनो बंद करण्यात येतील. तसेच गोव्याची अस्मिता व वेगळेपण टिकवून ठेवण्याबरोबरच संवर्धन करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे अभिवचनही कॉंग्रेसने जाहीरनाम्यातून दिले आहे.
गृहआधार ५ हजार रु.
गृह आधार योजनेखाली सध्या महिलांना जी आर्थिक मदत मिळते ती वाढवून ५ हजार रु. करण्यात येईल. गरजूंना सवलतीच्या दरात जेवण देण्यासाठी उपहारगृहांची स्थापना करण्यात येईल. दुहेरी नागरिकत्त्व असलेल्या विदेशातील गोमंतकीयांना मतदानाचा हक्क मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे जाहीरनाम्यातून स्पष्ट करण्यात आले आहे. रुग्णांना मोफत आरोग्य सेवा व मोफत औषध पुरवठा व कर्करोग व एड्‌सग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठीच्या निधीत वाढ करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
माध्यम निवडीचा अधिकार
शैक्षणिक सुविधांत वाढ करण्यात येणार असून शालेय माध्यम निवडण्याचा अधिकार विद्यार्थ्यांना देण्यात येईल. मात्र, स्थानिक भाषेची निवड करणार्‍यांना जादा सवलती देण्यात येतील. प्रत्येक महाविद्यालयाला साधनसुविधा वाढीसाठी एकदाच १ कोटी रु. एवढा निधी देण्यात येईल.
जीवरक्षकांना पोलीस सेवेत सामावून घेतले जाईल व गोवा पर्यटन दल स्थापन केले जाईल. मोप विमानतळाचे स्वागत करीत दाबोळी विमानतळ राखला जाईल व त्याचे जागतिक दर्जाच्या विमानतळात रुपांतर केले जाईल. आयटी धोरणात सुधारणा व अंमलबजावणी आदी आश्‍वासने दिली आहेत.
युवकांना मोफत पेट्रोल
युवकांसाठीच्या जाहीरनाम्यात युवकांना दर महिन्याला ५ लिटर मोफत पेट्रोल, युवा आयोगाची स्थापना, क्रीडा विद्यापीठ, वैद्यकीय व दंत महाविद्यालयात वाय-फाय, गोवा सांस्कृतिक महोत्सव, मोफत कोचिंग व स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर्स यांचा समावेश आहे.

जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे

  • प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्याला दरमहा पाच लीटर पेट्रोल.
  • महिला गृह आधारखाली दरमहा ५००० रुपये
  • वार्षिक एक लाख उत्पन्नाखालील कुटुंबातील बेकारांना ५ हजार रू. भत्ता.
  • दारिद्य्ररेषेखालील लोकांना गहू २ रूपये, तांदुळ ३ रुपये व साखर ७ रुपये किलो दराने देणारी ‘२-३-७’ योजना राबवणार.
  • दारिद्य्ररेषेखालील सर्वांना मोफत वीज व पाणी.
  • सर्व घरगुती ग्राहकांना २०१२ च्या पूर्वीचे वीज व पाणी दर.
  • खासगी नोकर्‍यांत गोमंतकीयांना आरक्षण.
  • सर्व कंत्राटी कामगार नियमित करणार.
  • ८ वी पास झालेल्यांनाही सरकारी नोकरी.
  • सर्व स्वयंसहाय्य गटांना ५० हजारांची मदत.
  • विदेशस्थ नागरिक व दुहेरी नागरिकत्व असलेल्यांनाही मताधिकार.
  • शैक्षणिक माध्यम ठरवणे हा पालकांचा अधिकार.
  • प्राथमिक स्तरावर भाषेच्या निकषावर शैक्षणिक संस्थांत भेदभाव नाही.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशी पाळून खाणी तात्काळ सुरू करणार.
  • जनमत कौलाचा वर्षभर सुवर्णमहोत्सव साजरा करणार.
  • १६ जानेवारी ‘ओस्मिताय दिवस’ साजरा करणार.
  • तरंगते कॅसिनो नद्यांतून हद्दपार करणार
  • डिफेन्स एक्स्पो, बेतूल बंदर आदींना विरोध.