>> शशी थरूर व मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात लढत
तब्बल २२ वर्षांनी अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या अध्यक्षपदाची आज सोमवारी निवडणूक होत आहे. या निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे विरुद्ध शशी थरूर यांच्यात ही लढत होणार आहे. देशभरातील सर्व राज्यांमध्ये हे मतदान होणार आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांनी केले आहे.
सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्यातील कोणीही कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाहीत. त्यामुळे पाठीमागील जवळपास २४ वर्षांनंतर प्रथमच कॉंग्रेस अध्यक्षपदावर गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती दिसणार आहे.
राहुल गांधी यात्रेत
दरम्यान, अध्यक्ष पदासाठी होणार्या निवडणुकीसाठी राहुल गांधी हे नेमके कोठून मतदान करणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. यावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी काल रविवारी, राहुल गांधी मतदानादिवशी ‘भारत जोडो’ यात्रेत असतील. या यात्रेदरम्यान ते कर्नाटकातील बल्लारी जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेच्या शिबिराच्या ठिकाणी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करणार असल्याची माहिती दिली.
पक्षाच्या सर्वोच्च पदासाठी शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात लढत होत आहे. खर्गे हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय मानले जातात.
इलेक्टोरल कॉलेजचा समावेश असलेल्या ९,००० पीसीसी प्रतिनिधींना आकर्षित करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी अनेक राज्यांमध्ये प्रचार केला आहे. याबाबत बोलताना शशी थरूर यांनी, तरुण आणि पक्षातील खालच्या स्तरातील लोक आपल्याला पाठिंबा देत असून वरिष्ठ खर्गे यांना पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे. पुढे बोलताना श्री. थरूर यांनी, मला तरुण मतदारांचा पाठिंबा मिळत आहे. मला खालच्या स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले.
मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच काल रविवारी शशी थरूर त्यांच्या प्रचारासाठी लखनौला पोहोचले आणि तिथे त्यांनी प्रदेश कॉंग्रेस समितीच्या सदस्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पीसीसीच्या सर्व सदस्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. राहुल गांधींनी अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नाही, असा निर्णय घेतला, त्यामुळेच मला निवडणूक विचार करावा लागला असल्याचे थरूर यांनी सांगितले.
आता कॉंग्रेसचे अस्तित्व वाचवायचे आहे, त्यामुळे कॉंग्रेसला बळकट करावे लागेल. हे काम एक कणखर अध्यक्षच करू शकतो असे पुढे थरूर यांनी सांगितले. पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यापूर्वी सोनिया गांधी यांची भेट घेतल्याचेही थरूर यांनी सांगितले. सोनियांसमोर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यांनीच निवडणूक लढवण्यास सांगितले होते. त्यामुळेच मी पूर्ण प्रामाणिकपणे आणि निष्पक्षपणे निवडणूक लढवत असल्याचे थरूर म्हणाले.