कॉंग्रेसला गतवैभव मिळवून देण्याचे एकमेव लक्ष्य : फालेरो

0
71

कॉंग्रेसने आपल्याला सर्वकाही दिले. आता कोणत्याही कारणासाठी स्पर्धा करण्याची इच्छा नाही. पक्षाचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी आपण कार्यालयात अधिक वेळ न घालवता तळागाळात जाऊन म्हणजे गट समित्या बळकट करण्यासाठी काम करणार असल्याचे नवनियुक्त प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुइझिन फालेरो यांनी सांगितले. गोव्याला विशेष दर्जा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी पर्रीकर सरकारला सहकार्य करण्यास आपण तयार आहे, असेही त्यांनी सांगितले.येथील मांडवी हॉटेल समोरील रिव्हेरीयामध्ये आयोजित कार्यक्रमात पदाचा ताबा घेतल्यानंतर ते बोलत होते. कॉंग्रेसचा पराभव झाला तरी पक्ष कमकुवत बनलेला नाही. आपल्या घरातील मळलेले कपडे चव्हाट्यावर आणून धुण्याचे प्रकार बंद केले पाहिजेत. ते केले तर पक्ष संघटित होऊन राज्याची सत्ता हाती येईल, असे ते म्हणाले. आपण सध्या कुणावरही टीका करणार नाही. राज्याच्या विकासासाठी आपण त्याग करण्यास तयार आहे. तळागाळातील पक्षाचे कार्यकर्ते हे खांब आहेत. त्यांच्यावर पक्ष अवलंबून असतो, याचा विसर पडता कामा नये, असे त्यांनी सांगितले.
आपल्या पक्षाकडून चुका घडल्या असतील तर त्या मान्य करून सुधारणा करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, आपले त्यादृष्टीकोनातूनच आपला प्रयत्न असेल, असे फालेरो म्हणाले. गोवा ही माझी जन्मभूमी व कर्मभूमीही आहे. पक्षातील सर्वांचा मान राखला जाईल, असे आश्‍वासन फालेरो यांनी दिले. पक्षाच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी संघटित व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
गोव्यापासून केंद्राला बर्‍याच प्रमाणात महसूल मिळतो. परंतु राज्याला त्यातील फक्त दहा टक्केच दिले जाते. त्यामुळे केंद्राकडून राज्याला आवश्यक तो वाटा मिळावा म्हणून सरकारने प्रयत्न करावे, असे आवाहन फालेरो यांनी केले. गोव्यात लुइझिन फालेरो येणार याची गोमंतकीय वाट पहात होते. आता ते आल्याने पक्षाचे गेलेले वैभव निश्‍चितच पुन्हा मिळेल, असे विरोधी नेते प्रतापसिंह राणे यांनी सांगितले.
उत्तर पूर्व भारतात फालेरो यांनी महत्वाची कामगिरी केली आहे. सरकारे येतात, सरकारे जातात, ही लोकशाही आहे. ती टिकवून ठेवणे हे महत्वाचे कार्य असते, असे राणे म्हणाले. गोव्याची शांतता, सलोखा राखण्याचे आवाहनही राणे यांनी केले. खाण व पर्यटन हे या राज्यातील महत्वाचे व्यवसाय आहेत. त्यावरच गोव्याची आर्थिक स्थिती अवलंबून आहे. ‘इबोला’ या महाभयंकर रोगाचे आफ्रिकेतील भागात थैमान चालू आहे. युरोप व अमेरिकतेही भीती पसरली आहे. या रोगावर उपचार नाही. त्यामुळे पर्यटनाच्या नावाखाली कुणालाही येऊ देऊ नका. पर्यटन व्यवसायाच धोक्यात येऊ शकेल, असा इशारा राणे यांनी दिला.
फालेरो यांची प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती केल्याने राणेचा उत्साह बराच वाढल्याचे दिसून आले. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री रवी नाईक, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, माजी अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांच्यासह जवळ जवळ सर्वच आमदार, माजी आमदार उपस्थित होते. आमदार माविन गुदिन्हो यांनी उपस्थित राहणे टाळले. मडगावचे आमदार दिगंबर कामत गोव्याबाहेर असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. के. शेख यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. प्रमोद साळगांवकर यांनी केले. यावेळी हजारावर कार्यकर्ते उपस्थित होते.