कॉंग्रेसला एवढ्यात निकाली काढू नका ः सोनिया

0
102

निवडणुकीत हार – जीत ही होतच असते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष पुन्हा देशात सत्तेवर येईल असा विश्वास कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला. कॉंग्रेसला एवढ्यातच निकाली काढू नका असे त्या म्हणाल्या. इंदिरा गांधींनाही असेच निकाली काढण्यात आले होते, परंतु त्यांनी पुनरागमन केले. आम्हीही लढत राहू असे सोनिया म्हणाल्या.

राहुल गांधी हे पक्षनेतृत्व स्वीकारतील का या प्रश्नाचे उत्तर आपण देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी सोनियांची ही मुलाखत घेतली आहे.
जवळजवळ नऊ वर्षानंतर पहिल्यांदाच दिलेल्या मुलाखतीत सोनिया गांधी यांनी आपल्या सासू श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या नसत्या तर आपण राजकारणात आले नसते असे सोनिया उद्गारल्या.
माझी सासू, पती आणि पक्ष यांची मूल्ये जपण्यासाठी राजकारणात न उतरणे हा भेकडपणा ठरेल असे आपल्याला वाटले असे प्रतिपादन सोनिया यांनी केले. डॉक्टर किंवा प्राध्यापकांच्या घराण्यात जशी वंशपरंपरा चालते, तशाच प्रकारे आपल्या कुटुंबानेही राजकीय वारसा जपला असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इंदिरा गांधींशी तुलना होऊच शकत नसल्याचेही सोनिया यांनी स्पष्ट केले. इंदिरा गांधींच्या मनात सामान्यांबद्दल अपार कणव होती असे मतही सोनिया यांनी यावेळी व्यक्त केले. आपण महिला असल्याचा न्यूनगंड इंदिरा यांनी कधीही बाळगला नसल्याचेही त्या म्हणाल्या. प्रियंका व राहुल यांच्यात इंदिरा गांधींचे वेगवेगळे गुण उतरले असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.