आजीला भेटायला इटलीला रवाना; विरोधकांची टीका
कॉंग्रेस पक्षाच्या १३६ व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहून पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी विदेशात सुटीवर निघून गेले असून त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. काल सकाळीच कतार एअरवेजच्या विमानाने राहुल इटलीतील मिलानला रवाना झाले आहेत.
पक्षाच्या काल झालेल्या स्थापना दिन सोहळ्याला सोनिया गांधीही अनुपस्थित होत्या. पक्षाचे नेते ए. के. अँटनी यांनी पक्षाच्या ध्वजाचे अनावरण केले.
कॉंग्रेस पक्षापुढे आव्हाने असल्याची कबुली पक्षनेते आनंद शर्मा यांनी काल दिली. मात्र, भारतीय जनता पक्षाप्रमाणे कॉंग्रेस पक्षात हुकूमशाही चालत नसून लोकशाही चालते असे ते म्हणाले. पक्ष कसा बळकट करता येईल यावर आम्ही पक्षांतर्गत व्यासपीठावर चर्चा करू व तोडगा काढू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘‘कॉंग्रेस नेते राहुल गांधी छोट्या वैयक्तिक भेटीवर विदेशात गेले असून काही दिवस ते तेथे असतील’’असे कॉंग्रेस पक्षातर्फे रणजीत सुरजेवाला यांनी काल सांगितले. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने राहुल गांधींच्या विदेशात जाण्यावरून टीकेची झोड उठविली.
कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी वडेरा यांना काल राहुल यांच्या विदेशात जाण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले असता त्यांनी त्यावर उत्तर देणे टाळले. पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात स्थापना दिन साजरा करण्यात आला. मात्र पक्षाच्या विद्यमान अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यावेळी अनुपस्थित होत्या.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राहुल गांधींच्या विदेश दौर्यावर टीका करणारे ट्वीट केले. पक्षाध्यक्षपदासाठी ज्याच्या नावाचा विचार चालला आहे, तेच राहुल गांधी स्थापना दिनाला अनुपस्थित का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राहुल गांधी आपल्या आजारी असलेल्या आजीला भेटायला गेले आहेत. अशा प्रकारे भेटीसाठी त्यांनी जाणे चुकीचे आहे का असे कॉंग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले.