कॉंग्रेसच्या अंतर्गत भांडणांमुळेच भाजपासोबत गेलो ः विजय सरदेसाई

0
104

कॉंग्रेस नेत्यांनी दोन वेळा आपल्या पाठीत सुरा खुपसला. समविचारी पक्ष म्हणून तरीही त्यांना पाठिंबा देण्याची गोवा फॉरवर्ड पक्षाची तयारी होती, पण कॉंग्रेस विधिमंडळ गटनेतेपदासाठी सुरू असलेले भांडण पाहून हे आताच आपसात भांडायला लागले, तर गोव्याचा राज्यकारभार कसा चालवतील असा प्रश्न पडल्यानेच आपण भाजपाला राज्याच्या विकासासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, असे आमदार विजय सरदेसाई यांनी काल सांगितले.

काल दवंदे येथील आपल्या निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीत भाजपला पाठिंबा देण्यामागचे कारण त्यांनी विशद केले. यावेळी जमलेल्या लोकांनी सरदेसाई यांनी भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आपण घाईघाईने निर्णय घेतल्याबद्दल सरदेसाई यांनी माफी मागितली, पण तात्काळ निर्णय घेण्यामागील कारणे सांगितली. कॉंग्रेसच्या प्रस्तावाची आपण दोन दिवस वाट पाहिली, पण तेथे मुख्यमंत्रिपदासाठी पाच जण इच्छुक होते. रेजिनाल्ड लॉरेन्स वा दिगंबर कामत यांना मुख्यमंत्री करणार असाल तरच पाठिंबा देतो असे आम्ही सांगितले होते, पण नेतृत्वाचा प्रश्न न सुटल्याने हा निर्णय घेतल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.
कॉंग्रेस ही भाजपची ‘बी टीम’ आहे हे आपण नेहमीच सांगतो. आम्ही ‘ए’ टीमशी समझोता केला तो विकासासाठी. अल्पसंख्यकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू. जर अल्पसंख्यकांच्या विरोधात सरकार निर्णय घेणार असेल, तर आपण त्याला विरोध करू व प्रसंगी पाठिंबाही काढून घेऊ असेही सरदेसाई म्हणाले.
मनोहर पर्रीकर हे उत्कृष्ट प्रशासक आहेत. केंद्रात गेल्या दोन वर्षांत त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. गोव्याच्या विकासासाठी ते भरीव निधी आणू शकतील असा विश्वास सरदेसाई यांनी व्यक्त केला.
गोवा फॉरवर्डच्या अल्पसंख्यक विभागाचे अध्यक्ष व नगरसेवक रिटो कार्दोझ म्हणाले, आम्ही भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल सरदेसाई यांना जाब विचारायला गेलो होतो. अल्पसंख्यकांसाठी आपण काय कराल यावर मतदारसंघाच्या विकासासाठी, बेकार, शिक्षित तरुणांना नोकर्‍या देण्यासाठी सत्तेत राहणे गरजेचे असते असे सरदेसाई यांनी सांगितल्याचे ते म्हणाले. कॉंग्रेस सरकारच्या माध्यम धोरणालाच सरदेसाई यांनी पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.