कॉंग्रेसचे ७ उमेदवार जाहीर

0
63

>> आतापर्यंत घोषित उमेदवारांची संख्या ३४ : कळंगुटमध्ये सिक्वेरा

 

कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी काल आपल्या आणखी सात उमेदवारांची घोषणा केली. यामुळे कॉंग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांची संख्या ३४ झाली आहे.
कॉंग्रेसचे सरचिटणीस एम.के.शेख यांनी पुढीलप्रमाणे सात उमेदवार जाहीर केले. म्हापसा- विजय भिके, कळंगुट- जोसेफ सिक्वेरा, सांताक्रूझ- टोनी फर्नांडिस, कुंभारजुवे- फिएल्हो झेवियर, मयें- संतोष सावंत, वास्को- सैफुल्ला खान, बाणावली- एडविन बार्रेटो.
विशेष म्हणजे कळंगुट मतदारसंघात माजी आमदार आग्नेलो फर्नांडिस हे कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रबळ उमेदवार मानले जात होते. मात्र या पक्षाने कळंगुटचे उपसरपंच असलेल्या जोसेफ सिक्वेरा यांना झुकते माप दिले. सिक्वेरा व भाजपचे स्थानिक आमदार मायकल लोबो यांच्याशी अलीकडील काळात वारंवार संघर्ष होत असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वीच एका प्रकरणावरून त्यांच्यात हातघाई होऊन पोलिस तक्रारीही नोंद झाल्या होत्या.
कॉंग्रेसचे या आधीच्या निवडणुकीतील उमेदवार प्रवीण झांट्ये यांना भाजपची उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट झाल्याने यावेळी ही उमेदवारी संतोष सावंत यांना देण्यात आली आहे.
कॉंग्रेसचे कुंभारजुव्याचे आमदार पांडुरंग मडकईकर यांना भाजपची उमेदवारी मिळाल्याने कॉंग्रेसने फिएल्हो झेवियर यांना तेथे उमेदवारी बहाल केली आहे.