कॉंग्रेसच्या कोणत्याही आमदाराला फोडण्याचा आपल्या पक्षाचा इरादा नाही, असे नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी काल विधानसभेत विरोधी सदस्यांना उद्देशून सांगितले.
विनय तेंडुलकर यांची राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलण्यासाठी उभे राहिलेल्या सरदेसाई यांनी बाबूश मोन्सेर्रात यांच्या पक्षप्रवेशाचा संदर्भ देत कॉंग्रेसवर हल्ला चढवला. कॉंग्रसचे राष्ट्रीय सरचिटणीस चेल्लाकुमार यांचा त्यांनी ‘लुंगी’ असा उल्लेख केला. पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी मंत्र्यांचे हे वर्तन योग्य नसल्याची त्यांना समज दिली. सरदेसाई ठरावावर बोलण्यासाठी उभे राहीले, पण तेंडुलकरांचे अभिनंदन त्यांनी केलेच नाही असा टोला विरोधी नेते बाबू कवळेकर यांनी हाणला.
प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांची राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल काल विधानसभेत त्यांचे अभिनंदन करणारा ठराव संमत करण्यात आला. डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांनी हा ठराव मांडला होता. त्यांनी ठरावावरील भाषणात तेंडुलकर यांनी पक्षासाठी केलेल्या त्यागाची माहिती दिली.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ठरावावर बोलताना मंत्रिमंडळाचा आकार फक्त १२ सदस्यीय ठेवण्याच्या निर्णयानंतर तेंडुलकर यांनी मंत्रीपदाचा स्वत:हून राजीनामा कसा सादर केला ते सांगताना, अशा प्रकाराच्या त्यागाची भावना विरोधी आमदारांमध्ये नाही, असे सांगितले.