केसांमधला कोंडा

0
165
  • डॉ. अनुपमा कुडचडकर

एकदा केसांत कोंडा व्हायला लागला की कोंडा घालवायचे शांपू काही महिने, काही वर्षे वापरावे लागतात. आहारात जीवनसत्व ‘अ’ असलेली भाजी व फळे जास्त वापरावी लागतात. मनावरचे ताणतणाव कमी करण्यासाठी प्राणायाम, योगासन, ध्यान केल्यास मोठा फायदा होऊ शकतो.

हल्लीच्या मुलांमध्ये केसांमधील कोंडा, मुरमं आणि केस गळणे या तक्रारी फार आढळतात. केसांमधील, जास्तकरून डोक्यावर आढळतो. हा कोंडा पुष्कळदा चेहर्‍यावर, भुवयांवर, पापण्यांवर, नाकाच्या बाजूला, हनुवटीवर पण आढळतो. काहींना छातीवर व पाठीवरही कोंडा आढळतो. कधी कधी काखेत किंवा जांघेतही कोंडा आढळून येतो. कोंडा व्हायचं मुख्य कारण म्हणजे त्वचेवर जास्त प्रमाणात उठणारं तेल. त्वचेचा तेलकटपणा वाढला की ज्या भागावर केस असतात त्या भागावर ‘पीटीरीओस्पोरम ओव्हाले’ नावाचे जंतू जे एरव्ही कमी प्रमाणात असतात ते एकदम वाढू लागतात. त्यामुळे त्वचेवर एकप्रकारचा थर तयार होतो. त्याच्या नंतर खपल्या बनतात. व त्वचेवर सालीप्रमाणे त्या निघू लागतात. याच खपल्यांना कोंडा म्हणतात. त्वचेवरचा तेलकटपणा काही हार्मोन्समध्ये झालेल्या बदलांमुळेसुद्धा होऊ शकतो. मानसिक ताण तणाव, अपुरा आहार, अंथरुणावर खिळलेले रुग्ण आणि अस्वच्छ असलेले केस हीपण कोंडा व्हायची काही कारणे आहेत.

कोंडा झाला की डोक्यावर खाज येते. ज्या जागेवर खाज येते तो भाग खाजवला की त्या भागावर खपल्या निघतात. खाजवून खाजवून एकेकदा डोकं लाल होतं, पुरळ येतात, घावसुद्धा होतात. जेव्हा कोंडा जास्त प्रमाणात होतो तेव्हा तो एकेकदा अंगभरसुद्धा पसरू शकतो. डोक्यावर कोंडा जास्त प्रमाणात झाला की केस गळायला सुुरुवात होते.

डोक्यावर सोरियासीस झालं तरी तेपण सुरुवातीला कोंड्यासारखंच दिसतं. डोक्यावरची फंगल इन्फेक्शनपण कोंड्यासारखीच दिसतात.
कोंडा घालविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे शांपू मिळतात. जास्त प्रमाणात झालेल्या कोंड्यावर इलाज करायला मलम पण मिळते. एकदा केसांत कोंडा व्हायला लागला की कोंडा घालवायचे शांपू काही महिने, काही वर्षे वापरावे लागतात. आहारात जीवनसत्व ‘अ’ असलेली भाजी व फळे जास्त वापरावी लागतात. केसांची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. मनावरचे ताण तणाव कमी करण्यासाठी प्राणायाम, योगासन, ध्यान केल्यास त्याचा पण फार मोठा फायदा होऊ शकतो. कोंडा झालेल्या व्यक्तींनी डोक्यावर तेल वापरणं टाळावं व नियमित दोन-तीन दिवसांनी कोंड्यासाठी मिळणार्‍या शांपूने डोकं व केस स्वच्छ धुवून घ्यावेत.