केलंबिका कला मंचचे ‘आरण्यक’ प्रथम

0
19

कला अकादमीच्या 74 व्या मराठी ‘ब’ गट नाट्यस्पर्धेचा निकाल जाहीर

कला अकादमीने आयोजित केलेल्या 74 व्या मराठी ‘ब’ गट नाट्यस्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, मुळगाव-डिचोली येथील श्री केलंबिका कला मंचने सादर केलेल्या ‘आरण्यक’ या नाटकास 50 हजार रुपयांचे प्रथम बक्षीस प्राप्त झाले. विठ्ठलापुर-साखळी येथील श्री पांडुरंग प्रासादिक नाट्य मंडळाच्या ‘मगरमिठी’ नाट्यप्रयोगास 40 हजार रुपयांचे द्वितीय बक्षीस, तर मयडे-बार्देश येथील कलाकार कला मंचच्या ‘राहिले दूर घर माझे’ या नाटकाची 30 हजार रुपयांच्या तृतीय बक्षिसासाठी निवड झाली. 20 हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक श्री विठ्ठल मंच सांगाती (कारापूर तिस्क साखळी) यांच्या ‘मृत आत्मा’ या नाटकाला जाहीर झाले.

उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम बक्षीस गौरेश गावडे यांना मगरमिठी या नाटकासाठी, तर दत्तात्रय बर्वे यांना आरण्यक नाटकासाठी द्वितीय बक्षीस जाहीर झाले. तृतीय पारितोषिक अनुप विजय कदम यांना ‘राहिले दूर घर माझे’ या नाटकासाठी घोषित करण्यात आले.
पुरुष गटात वैयक्तिक अभिनयासाठी नारायण भाटवडेकर यांना मगरमिठी नाटकातील प्रिं काळे या भूमिकेसाठी प्रथम बक्षीस, तर द्वितीय बक्षीस दत्तात्रय बर्वे यांना आरण्यक नाटकातील धृतराष्ट्र या भूमिकेसाठी प्राप्त झाले.

स्त्री गटात वैयक्तिक अभिनयासाठी प्रांजल मिलिंद मराठे यांना ‘आरण्यक’ या नाटकातील गांधारी भूमिकेसाठी प्रथम पारितोषिक, तर सोनिया परेश शेटये यांना ‘राहिले दूर घर माझे’ नाटकातील माई या भूमिकेसाठी द्वितीय पारितोषिक जाहीर झाले. उत्कृष्ट नेपथ्यासाठीचे पारितोषिक सर्वेश च्यारी यांना, वृषभ च्यारी यांना प्रशस्तीपत्रक दिले जाईल. प्रकाशयोजनेसाठी गार्गी बर्वे यांनी पारितोषिक पटकावले, तर प्रशस्तीपत्रक उमेश कारबोटकर यांना दिले जाईल. वेषभूषेसाठीचे बक्षीस शिल्पा नागेशकर यांना, तर प्रशस्तीपत्रक भाविका बांदोडकर यांना दिले जाईल. उत्कृष्ट पार्श्वसंगीतासाठीचे बक्षीस सागर गावस यांना, तर साईनाथ गावकर यांना प्रदान केले जाईल. रंगभूषेचे पारितोषिक जितेंद्र परब यांना, तर श्रमेश नाईक यांना प्रशस्तीपत्रक दिले जाईल. नाट्यलेखनासाठी प्रथम पारितोषिक श्रीकांत कासकर यांना ‘ही तरुणाई’ नाटकासाठी, तर द्वितीय पारितोषिक सिध्दांत खांडेकर यांनी ‘मृत आत्मा’ नाटकासाठी पटकावले.
या स्पर्धेसाठी एकूण 14 प्रवेशिका विविध संस्थांकडून आल्या होत्या, त्यातून 12 नाटके सादर झाली. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.