केरोसिन पुरवठा किरकोळ विक्रेत्यांना बंद होणार

0
71

एलपीजी गॅसजोडणी नसलेल्या कुटुंबांनाच रेशनवर केरोसिन वितरीत करण्याचे ठरविल्याने येत्या ऑक्टोबर नंतर अनेक कुटुंबांना मिळत असलेला केरोसिन कोटा बंद होईल. त्यामुळे राज्यातील केरोसिनच्या किरकोळ विक्रेत्यांना नागरी पुरवठा खात्यातर्फे होणारा केरोसिन पुरवठा बंद होईल. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे एलपीजी गॅसजोडणी नसलेल्यांना तपशीलवार माहितीसह खात्याकडे अर्ज करण्यास सांगितले आहे. नागरी पुरवठा खात्यातर्फे देण्यात आलेली रेशन कार्डे आधार कार्डांना जोडण्यात आल्याने खात्याकडे एलपीजी जोडण्या संबंधीचा तपशील उपलब्ध आहे. त्यामुळे केरोसिन कोटा मिळविण्यासाठी कोणत्याही रेशन कार्डधारकाला बनवेगिरी करता येणार नाही.

राज्यात कितीजणांकडे खरोखरच गॅसजोडण्या नाहीत, त्याचे चित्र ऑक्टोबर दरम्यान स्पष्ट होऊ शकेल, असे खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. केंद्र सरकारने सर्व राज्यांना रेशनकार्डावर केरोसिन पुरविणे बंद करण्यास सांगितले आहे. राज्यातील एलपीजी गॅसजोडण्या असलेली कुटुंबेही कॅरोसिन घेत होती. यापुढे हा प्रकार पूर्णपणे बंद होईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले. सरकारच्या या निर्णयामुळे केरोसिनचा काळाबाजार नियंत्रणाखाली येण्यास मदत होणार आहे.