केरी समुद्रात बुडालेल्या अन्य दोघांचे मृतदेह सापडले

0
7

सेल्फीच्या नादात केरी आजोबा देवस्थानलगतच्या समुद्रात रविवारी बार्देश तालुक्यातील चौघे जण बुडाले होते. त्यातील दोघांचे मृतदेह त्याच दिवशी सापडले होते, तर दोघे जण बेपत्ता होते. त्यापैकी एकाच मृतदेह काल सकाळी घटनास्थळाच्या ठिकाणीच, तर दुसरा मृतदेह केरी तेरेखोल किल्ल्याजवळ सापडला.

बार्देश तालुक्यातील म्हापसा आणि कांदोळी येथील काही युवकांचा गट आपल्या कुटुंबीयांसोबत सहलीचा आनंद लुटण्यासाठी रविवारी केरी किनारी भागात आला होता. त्यावेळी सेल्फी काढण्याच्या नादात या गटातील चौघे बुडाले होते. त्यापैकी सकीना खातून (18) आणि मोहम्मद बाकीर अली (24) यांचे मृतदेह रविवारीच सापडले होते. अन्य दोघांपैकी मोहम्मद अलीम अख्तर (18) आणि मोहम्मद यासिन (14, दोघेही रा. कांदोळी) यांचे मृतदेह काल सापडले. शोधमोहीम पथकाने समुद्रातून त्यांचे मृतदेह बाहेर काढले. दोन दिवसांपूर्वीच रमजान ईद साजरी केल्यानंतर 23 जणांचा हा गट केरी किनाऱ्यावर फिरण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी आला होता.

धोक्याचा इशारा देणाऱ्या
फलकाकडे दुर्लक्ष

चौघे जणांचा समुद्रात बुडून मृत्यू होणे ही घटना पेडणे तालुक्यात प्रथमच घडली आहे. ज्या ठिकाणी ही मुले सेल्फी काढण्याच्या नादात धोकादायक खडकावर उभी होती, त्या ठिकाणी धोकादायक जागा (डेंजर झोन) म्हणून फलकही लावण्यात आला होता. त्या फलकाकडे दुर्लक्ष करीत हे चौघे आपली एक छानपैकी सेल्फी काढावी, यासाठी खडकावर उभे राहिले, त्याचवेळी एक जोरदार लाट आली आणि त्या लाटेबरोबर हे चारही युवक वाहने गेले.

एका युवकाची धडपड व्यर्थ
हे चार युवक वाहून गेल्यावर त्यांच्यातीलच एक आसिफ याने या चौघांना वाचवण्यासाठी खडकावरून समुद्रात उडी घेतली, मात्र तो त्या चौघांनाही वाचवू शकला नाही. उलट तोच खडकावर आपटून त्याला थोडी दुखापत झाल्यानंतर सध्या त्याच्यावर इस्पितळात उपचार चालू आहेत.