हरमल (न. वा.)
पालये -किरणपाणी व केरी येथील स्थानिक रेती व्यावसायिकांनी महाराष्ट्रातून बेकायदेशीरपणे रेती, चिरे, खडीची पालये – किरणपणीमार्गे गोव्यात वाहतूक करणार्या ट्रक वाहनचालकांनाआज शुक्रवार दि. १२ रोजी पालये किरणपाणी येथे पाच तास रोखून धरून ट्रक वाहतूक माघारी वळवली. दरम्यान जोपर्यंत सरकारकडून येथील स्थानिक रेती व्यावसायिकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत पालये-किरणपाणीमार्गे महाराष्ट्रातील रेती वाहतुकीचे ट्रक रोखून धरले जातील व याविरुद्ध उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक रेती व्यावसायिकांनी दिला आहे.
सरपंच उदय गवंडी यांनी या मागणीचा पुनरुच्चार करून स्थानिक व्यावसायिकांना पाठिंबा दिला आहे. न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून आम्ही मे महिन्याच्या ३० तारखेपासून ते आजपर्यंत व्यवसाय बंद ठेऊन होड्या नांगरून ठेवल्या आहेत. निदान आता तरी शासनाने आम्हाला दिलासा द्यावा अशी मागणी रेती व्यावसायिक रोहन केरकर यांनी केली. पूर्ण गोव्यात रेती व्यवसाय बंद असताना महाराष्ट्रातून बेकायदा बांधकाम साहित्याची वाहतूक खुलेआमपणे गोव्यात होत असताना खाण खाते, वाहतूक खाते, बंदर व कप्तान खात्याकड़ून कोणतीच ठोस कारवाई होत नाही. मात्र बंदीचा वटहुकूम केवळ पालये -किरणपाणी व केरी भागातील व्यावसायिकांना का असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रांतील रेती वाहतूक करणारे वाहनचालक ताडपत्रीचे आवरण न घालता वाहतूक करतात. त्यामुळे त्याचा त्रास अन्य दुचाकी वाहनचालकांना अधिक होत असतो. सरकारने अशा वाहतूक करणार्या वाहनचालकांवर त्वरित कारवाई करणे अपेक्षित असल्याचे वामन सावळ म्हणाले. गोव्यातील रेती व्यावसायिकांना खाण खात्याकडून गोवा राज्य मर्यादीत परवाना दिला जातो. मात्र तोच परवाना महाराष्ट्रातील व्यावसायिकांना अखिल भारतीय म्हणून दिला जातो. मग कायदा सर्वाना समान असताना दोन राज्यांसाठी दोन कायदे कसे? गोवा शासनाने आम्हा स्थानिक व्यावसायिकांना येथील रेती व्यावसायिकांना न्याय द्यावा अशी मागणी येथील रेती व्यावसायिक पीटर फर्नांडिस यांनी केली आहे. पेडणे तालुक्यांत अन्य भागांत रेती व्यवसाय सुरु आहे मात्र आम्हालाच कायद्याचे बंधन का ? असा सवालही येथील व्यावसायिकांनी उपस्थित केला.