केपेतील ‘त्या’ युवतीचा खून

0
276

>> पोलीस अधीक्षकांची माहिती

खेडे, पाडी, केपे येथे रविवारी ओहळात संशयास्पदरीत्या मृतावस्थेत सापडलेली हनिशा महादेव वेळीप (१९) या युवतीचा खून झाला असल्याचा पोलिसांना संशय असून त्या दृष्टीने पोलीस तपास करत असल्याची माहिती दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंह यांनी दिली. दरम्यान, हनिशाच्या आईने ओहोळावर सर्वेशला पाहिल्याची जबानी दिली असल्याने तिचा खून झाल्याचा संशयाला पुष्टी मिळाली आहे.

बारावीत शिकणारी हनिशा हिला तिचा कावरे-पिर्ला, केपे येथील प्रियकर सर्वेश गावकर (२२) याने ओहोळातील पाण्यात जबरदस्तीने डोके बुडवून ठार केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तिचा मृतदेह सापडलेल्या जागी अगदी कमी प्रमाणात पाणी होते. यामुळे खुनाचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला. तिचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतरच संशयित सर्वेशने तेथून सुमारे २५ कि. मी. अंतरावरील आपल्या कावरे पिर्ला येथील घरी जाऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सर्वेश हा बेकार होता. त्याचे हनिशावर प्रेम होते. त्याला हनिशासोबत लग्न करायचे होते. मात्र, हनिशाने त्याला नकार दिला असण्याची शक्यता असल्याने त्याने हे कृत्य केले असल्याचे पोलिसांचे प्राथमिक तपासानंतर म्हणणे आहे.

पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंह यांनी शवचिकित्सा अहवालात हनिशाचा मृत्यू पाण्यात गुदमरून झाल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती दिली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.

प्रेमसंबंध तुटल्याने
प्रियकराने संपवले
सर्वेश व हनिशा यांचे प्रेमसंबंध गेली दोन वर्षे चालू होते. मात्र, हनिशाच्या घरच्यांचा विरोध होता. यामुळे हल्लीच हनिशाने सर्वेशशी प्रेमसंबंध तोडले होते. रविवारी सर्वेश हनिशाच्या घराजवळ घुटमळत होता. ती कपडे धुण्यासाठी ओहोळावर गेल्याची संधी साधून तो तिच्यामागून गेला. त्या ठिकाणी त्यांच्यात वादावादी झाली व रागाच्या भरात सर्वेशने हनिशाला पाण्यात बुडवून मारल्याचा पोलिसांना संशय आहे.