केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी

0
11

>> कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाचा निर्णय

कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली. गुरुवारी रात्री सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केजरीवाल यांना अटक केली होती. काल त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून सायंकाळी निर्णय राखून ठेवला होता. अखेर रात्री साडेआठ वाजता न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची ईडी कोठडी सुनावली.

राजधानी दिल्लीतील वादग्रस्त मद्यधोरणाशी संबंधित प्रकरणात चौकशीसाठी केजरीवाल यांना ईडीकडून 9 वेळा समन्स बजाविण्यात आले होते. परंतु केजरीवाल यांनी एकाही समन्सला उत्तर दिलेले नव्हते किंवा ईडीसमोर हजरही राहिले नव्हते. त्यानंतर गुरुवारी रात्री त्यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केली. या अटकेविरोधात आपने लागलीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, तातडीच्या सुनावणीचीही मागणी करण्यात आली होती; परंतु काल आपने ही याचिका मागे घेतली. त्यानंतर, ईडीने अरविंद केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले.

ईडीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) एस. व्ही. राजू यांनी युक्तिवाद केला, तर केजरीवालांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली.
केजरीवाल यांना दिल्ली मद्य धोरण 2021-22 तयार करण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी साऊथ ग्रुपकडून कोट्यवधी रुपयांची लाच मिळाली होती, असा आरोप ईडीने यावेळी केला.

दिल्ली मद्य धोरण तयार करण्यात केजरीवाल यांचा थेट सहभाग असल्याचे ईडीने म्हटले आहे. त्यांना रोख रक्कम दोनदा हस्तांतरित करण्यात आली. आधी 10 कोटी आणि नंतर 15 कोटी रुपये देण्यात आले, असा दावाही ईडीने केला.
दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. न्यायमूर्तींनी दोन्ही बाजू ऐकून घेतली. काल सायंकाळी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला होता. त्यानंतर, काल रात्री न्यायालयाने निकाल जाहीर करत केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली. ईडीने केजरीवाल यांची 10 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने त्याला 7 दिवसांची कोठडी सुनावली.

गोव्याच्या निवडणुकीत 45 कोटी रुपये वापरले : ईडी
अरविंद केजरीवाल यांनी गोवा विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी साऊथ ग्रुपमधील काही आरोपींकडून 100 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यातील 45 कोटी रुपये गोवा निवडणुकीत वापरण्यात आले, असा दावाही ईडीतर्फे न्यायालयात करण्यात आला.

केजरीवालांचे वकील काय म्हणाले?
या प्रकरणात ईडीने काही जणांची चौकशी केली होती; मात्र त्यांनी अरविंद केजरीवाल यांचे नाव घेतले नव्हते. नंतर त्यांना अटक करण्यात आली. नंतर त्यांच्याकडून ईडीने आपल्या मर्जीनुसार जबाब लिहून घेतला आणि त्याच्या बदल्यात त्यांना जामीन मिळण्यात ईडीने कोणतीही आडकाठी आणली नाही, असा आरोप केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केला.