केजरीवाल यांची आज कुंकळ्ळी येथे सभा

0
72

>> पाच ते सहा हजारांच्या उपस्थितीचा दावा

 

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रण तथा नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आज सोमवार दि. १९ रोजी कुंकळ्ळी मतदारसंघात जाहीर सभा होणार आहे. या सभेला किमान पाच ते सहा हजार लोक उपस्थित राहणार आहेत असे पक्षातील सूत्रांनी काल सांगितले. या सभेला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला.
ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या या गावात आज गोवा मुक्ती दिनाचे औचित्य साधून या सभेचे आयोजन करण्यात आले आहे असे सूत्रांनी स्पष्ट केले. गोव्यात आम आदमी पक्षाला सत्ता मिळाल्यास आम्ही गोव्यातील जनतेला चांगले प्रशासन देणार याची गोव्यातील जनतेला जाणीव आहे.
नवी दिल्लीत आम्ही सामान्य जनतेसाठी ज्या योजना सुरू केलेल्या आहेत व तेथे जो विकास केलेला आहे त्याची लोकांना जाणीव आहे. तसाच विकास गोव्यात व्हावा अशी येथील जनतेची इच्छा आहे. त्यामुळे लोक यावेळी आम आदमी पक्षाच्या बाजूने राहणार असून आजच्या केजरीवाल याच्या सभेलाही लोक उदंड प्रतिसाद देतील असा विश्वासही या सूत्रांनी व्यक्त केला.
श्री. केजरीवाल याची जाहीर सभा आज दुपारी ३:३० वा होणार असून या सभेला पक्षाचे कुकळ्ळी मतदारसंघातील उमेदवार एल्विस गोम्स, पक्षाचे प्रचार समितीचे डॉ. ऑस्कर रिबेलो व अन्य नेते तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.