
कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीगच्या ११व्या पर्वातील काल गुरुवारी झालेल्या ३३व्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सचा ६ गडी व १४ चेंडू राखून पराभव केला. चेन्नईने विजयासाठी ठेवलेले १७८ धावांचे लक्ष्य केकेआरने १७.४ षटकांत गाठले. शुभमन गिल (नाबाद ५७) व दिनेश कार्तिक (नाबाद ४५) यांनी पाचव्या गड्यासाठी ८३ धावांची भागीदारी केली.
तत्पूर्वी, कोलकाताने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिल्यानंतर चेन्नईने २० षटकांत ५ गडी गमावून १७७ धावांपर्यंत मजल मारली. त्यांच्या एकाही खेळाडूला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही. फाफ ड्युप्लेसी व वॉटसन यांनी ४८ धावांची सलामी दिल्यानंतर मधल्या फळीतील त्यांचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत राहिले. धावगती वाढविण्यासाठी खेळपट्टीवर स्थिरावलेल्या फलंदाजाची गरज असताना रैना व वॉटसन माघारी परतले. धोनीने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत २५ चेंडूंत नाबाद ४३ धावांची खेळी केली. परंतु, संघाला दोनशे धावांच्या आसपास नेण्यास तो कमी पडला. विंडीजचा फिरकीपटू सुनील नारायणने आपल्या अचूकतेने चेन्नईच्या फलंदाजांना जखडून ठेवण्याचे काम केले. आपल्या ४ षटकात त्याने केवळ २० धावा मोजून २ गडी बाद केले.
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स ः शेन वॉटसन झे. मावी गो. नारायण ३६, फाफ ड्युप्लेसी त्रि. गो. चावला २७, सुरेश रैना झे. जॉन्सन गो. कुलदीप ३१, अंबाती रायडू त्रि. गो. नारायण २१, महेंद्रसिंग धोनी नाबाद ४३, रवींद्र जडेजा झे. कार्तिक गो. चावला १२, कर्ण शर्मा नाबाद ०, अवांतर ७, एकूण २० षटकांत ५ बाद १७७
गोलंदाजी ः मिचेल जॉन्सन ४-०-५१-०, पीयुष चावला ४-०-३५-२, शिवम मावी ३-०-२१-०, सुनील नारायण ४-०-२०-२, आंद्रे रसेल १-०-१२-०, कुलदीप यादव ४-०-३४-१. कोलकाता नाईट रायडर्स ः ख्रिस लिन झे. वॉटसन गो. एन्गिडी १२, सुनील नारायण झे. ब्राव्हो गो. जडेजा ३२, रॉबिन उथप्पा झे. ब्राव्हो गो. आसिफ ६, शुभमन गिल नाबाद ५७, रिंकू सिंग त्रि. गो. हरभजन १६, दिनेश कार्तिक नाबाद ४५, अवांतर १२, एकूण १७.४ षटकांत ४ बाद १८०
गोलंदाजी ः लुंगी एन्गिडी ३-०-३६-१, केएम आसिफ ३-०-३२-१, शेन वॉटसन २-०-१९-०, रवींद्र जडेजा ४-०-३९-१, हरभजन सिंग ३-०-२०-१, ड्वेन ब्राव्हो १.४-०-२२-०, कर्ण शर्मा १-०-११-०