>> प्रकाश जावडेकर यांची माहिती
केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत गोवा राज्य कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाला १०० इलेक्ट्रिक ई बसगाड्या मंजूर करण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारच्या एफएएमई इंडिया योजनेच्या दुसर्या टप्प्यात ६७० ई बसगाड्यांना मान्यता देण्यात आली आहे. त्यात कदंब वाहतूक महामंडळाला १०० इलेक्ट्रिक बसगाड्या मंजूर करण्यात आल्या आहेत. गोव्याबरोबर महाराष्ट्राला २४०, गुजरातला २५० आणि चंदीगडला ८० इलेक्ट्रिक बसगाड्या मंजूर झाल्या आहेत.
इको फ्रेंडली ई बसगाड्यांमुळे गोव्यातील वाहतूक सुधारणा आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यास मदत होणार आहे, असे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एका संदेशात म्हटले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १०० ई बसगाड्या मंजूर केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. राज्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला पाहिजे. कदंब महामंडळाला यापुढे इलेक्ट्रिक ई बसगाड्या देण्यावर भर दिला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
राज्यात वाहनांची वाढत्या संख्येमुळे प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ होत आहे. प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर नागरिकांनी भर द्यावा. राज्यात इलेक्ट्रिक वाहन खरेदीला चालना देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.