गोवा सरकारच्या ‘स्वयंपूर्ण गोवा’ कार्यक्रमाखाली केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान हे शनिवार दि. 31 ऑगस्ट रोजी राज्यातील शेतकरी, पंच सदस्य, स्वयंपूर्ण मित्र तसेच कृषी अधिकारी आदींना आभासी पद्धतीने मार्गदर्शन करतील, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शनिवारी सकाळी 11 वाजता शिवराजसिंह चौहान हे आभासी पध्दतीने (व्हर्च्युअली) शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील सर्व पंचायती, कृषी खात्याची विभागीय कार्यालये, रवींद्र भवने आदी मिळून राज्यातील 213 स्थळांवर स्क्रिन्स बसवून त्याद्वारे हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आपण साखळी रवींद्र भवनमध्ये या कार्यक्रमासाठी हजर राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
गोवा सरकारने कडधान्ये भाज्या, फळ, दूध याबाबतीत गोवा राज्य स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या योजनेपासून स्फूर्ती घेऊन ‘स्वयंपूर्ण गोवा’ ही योजना सुरू केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी वरील प्रकारे राज्यातील स्वयंपूर्ण मित्र, शेतकरी तसेच अन्य घटकांशी आभासी पध्दतीने संवाद साधून मार्गदर्शन केलेले आहे.