>> कॅसिनोंबाहेर तोबा गर्दी; राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती
राज्यात पर्यटक हंगाम सुरू झाल्याने किनार्यांबरोबरच राज्यातील शहरे व अन्य पर्यटनस्थळी सध्या देशी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. गोवा सरकारने राज्यातील तरंगते कॅसिनो सुरू करताना ते केवळ १० टक्के क्षमतेने सुरू करण्याची अट घातली होती. मात्र सध्या या कॅसिनोंवर जाण्यासाठी मोठी झुंबड उडत असून, काल पणजीतील या तरंगत्या कॅसिनोत प्रवेश मिळवण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कोरोनाविषयक नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आले.
पणजी शहरात येणार्या देशी-विदेशी पर्यटकांसाठी तर मांडवी नदीतील तरंगते कॅसिनो हे आता खास आकर्षण ठरू लागले आहेत. काल पणजीतील तरंगत्या कॅसिनोत जाण्यासाठी पर्यटकांची मोठे झुंबड उडाली होती. काल संध्याकाळी ७ वाजल्यापासून मांडवी नदीतील ‘बिग डॅडी’ या कॅसिनोत जाण्यासाठी पर्यटकांची एवढी झुंबड उडाली होती की तेथे चेंगराचेंगरी होण्याची भीती निर्माण झाली होती. पणजी-मिरामार रस्त्याला या कॅसिनो कार्यालयांजवळ जत्रेचे स्वरूप प्राप्त आले होते. पर्यटक कॅसिनोमध्ये प्रवेश मिळावा यासाठी तिकीट खरेदी करताना हमरीतुमरीवर आले होते. यावेळी तेथे मोठ्या संख्येने जमलेल्या पर्यटकांपैकी काही मोजक्याच जणांच्या तोंडावर मास्क दिसून आले. सामाजिक अंतराचे तर तीन तेरा वाजले होते. या सर्व प्रकारामुळे राज्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती जागरुक नागरिक व्यक्त करत आहेत.