पॅरा शिक्षकांचा आंदोलनाचा इशारा

0
52

राज्यातील कंत्राटी शिक्षकांचे धरणे आंदोलन संपते, तोच आता पॅरा शिक्षकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन करण्याचा इशारा काल येथील आझाद मैदानावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. राज्यातील कंत्राटी शिक्षकांना शांत करण्यात सरकारला यश प्राप्त झाले आहे. त्यानंतर आता पॅरा शिक्षकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आवाज उठवायला सुरुवात केली आहे.
पॅरा शिक्षक गेल्या १५ वर्षांपासून कार्यरत आहेत. या शिक्षकांना मागील ६ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही, अशी माहिती पॅरा शिक्षिका स्मिता देसाई यांनी दिली.

पॅरा शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी यापूर्वी आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी पॅरा शिक्षकांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र अद्याप भाजपने पॅरा शिक्षकांच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत. त्यामुळे पॅरा शिक्षकांनी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशन काळात निदर्शने करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता, असे स्मिता देसाई यांनी सांगितले.

पॅरा शिक्षकांशी बारा महिन्याचे करारपत्र करण्याच्या आश्‍वासनाची पूर्ती झालेली नाही. यासंबंधीचा लेखी आदेश जारी करण्यात आलेला नाही. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी पॅरा शिक्षकांना दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता भाजप सरकारने करावी, अशी मागणी देसाई यांनी केली.